सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे
बिबट्या नागरी वस्त्यांमध्ये वावरण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढले आहे. दररोज महाराष्ट्रात कोणत्या ना कोणत्या भागात बिबट्या निदर्शनास आल्याच समजतं. शिराळा तालुक्यातील अंत्री खुर्द येथील चौगुलेवस्तीच्या परिसरात असणाऱ्या शेताच्या बांधावरील एक निलगिरीच्या झाडावर एक वर्षे वय असणाऱ्या बिबट्याच्या पिल्लाचे दर्शन झाल्याने परिसरात मोठे भीतीचे वातावरण पसरले आहे. ग्रामस्थांना बिबट्याच्या बछड्याचे दर्शन झाल्यानंतर त्यांनी तातडीने वनविभागाला माहिती दिली वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्या बछड्यास हुसकावून लावले असून कर्मचारी त्या परिसरात तळ ठोकून आहेत.
हाती मिळालेल्या माहितीनुसार सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास अंत्री बुद्रुक शेतकरी शेतामध्ये कामासाठी गेले असता त्यांना बामनमळा परिसरात असणाऱ्या निलगिरीच्या झाडावर बिबट्याचे बछडे निदर्शनास आले. गावातील लोकांनी तातडीने विभागाशी संपर्क साधला. वनविभागाचे वनरक्षक प्रकाश पाटील, सचिन पाटील यांच्यासह कर्मचारी संपत देसाई, मारुती पाटील, संजय पाटणकर, संतोष कदम यांनी घटनास्थळी भेट दिली. लोकांची गर्दी असल्याने बिबट्यास हुसकवणे अवघड झाले होते. लोकांना इतरत्र बाजूला पाठवून त्यास मोकळी वाट करून दिल्यानंतर बछड्याने धूम ठोकली.
शेतकऱ्यांनी आपली कामे जागेवरच थांबवून जनावरे शेतातून गावातील गोठ्यात आणली. यापूर्वी वाकुर्डे खुर्द व बुद्रुक येथे झाडावर बिबट्या बसलेला आढळून आला होता. अनेक ठिकाणी बिबट्यांनी जनावरे व पाळीव प्राण्यांना आपले भक्ष्य बनवले आहे. काल बुधवारी रात्री संजय चौगुले यांच्या दोन शेळ्या बिबट्याने ठार केल्या आहेत. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये मोठे भीतीचे वातावरण आहे.