खाऊगल्ली | महाराष्ट्रात आखाड पार्टीचे विशेष वेगळे महत्व आहे. या महिन्यात भरपूर मटण खाऊन घ्यायचे आणि श्रावण महिना शाकाहारी बनायला सज्ज व्हायचे. हि एक अनोखी परंपरा आहे. महाराष्ट्रात अलीकडच्या काळात बिर्याणी हा खाद्य पदार्थ सर्वांच्या चवीला उतरू लागला आहे. त्यामुळे आज आम्ही तुमची आखाड पार्टी यादगार बनवायला घेऊन आलो आहोत हैद्राबादी मटण बिर्याणीची रेसिपी
साहित्य | बासमती तांदूळ अर्धा किलो, कोवळे मटण १ किलो, दही १ वाटी, आलं-लसूण पेस्ट ३ चमचे, कांदे उभे पातळ चिरलेले ५ नग, काजू १२ नग, लाल सुक्या मिरच्या (भिजवून वाटलेल्या) ५-६, बडीशेप पाव चमचा, मीठ चवीनुसार.
कृती | प्रथम मटण स्वच्छ धुऊन दही, आलं, लसूण थोडे मीठ लावून दोन तास ठेवा. भरपूर तूपात पातळ चिरलेले कांदे तळून घ्या. तळलेला कांदा पाव भाग काढून ठेवा. उरलेल्या तुपात काजू व मिरचीची पेस्ट परता. मग मटण व पाव चमचा बडीशेप घालून चांगले परता. मीठ व सव्वा वाटी पाणी घालून शिजवा.
थोड्याशा तुपात ५हिरवे वेलदोडे, ५ लवंग व थोडी जायपत्री व धुतलेले तांदूळ घाला. मीठ व पाणी घालून अर्धाकच्चा भात तयार करून थंड करा. काढून ठेवलेला कांदा, कोथिंबीर व थोडा पुदिना चिरून एकत्र करा. मटण, भात, कांदा पुन्हा मटण असे थर द्या. शेवटी पाऊण कप दुधात केशर अथवा केशरी रंग घाला. त्यातच १ थेंब केवडा इसेन्स घालून शिंपडा. झाकणाच्या बाजूने कणिक लावून बंद करा. गॅसवर ७-८ मिनिटे गरम करा. रायत्याबरोबर पानात वाढा.