प्रथेला फाटा देत पाच मुलींनी वडिलांच्या पार्थिवाला दिला खांदा

औरंगाबाद – पारंपरिक प्रथेला फाटा देत पाच मुलींनी वडिलांच्या पार्थिवाला खांदा दिला तर नातवाने आजोबाला अग्नीडाग दिला. जन्मदात्याची अंतिम इच्छा पूर्ण करीत समाजापुढे आदर्श निर्माण केल्याचा हा प्रसंग आज सकाळी वाळूज औद्योगिक परिसरातील बजाजनगरात घडला. परिसरात प्रथमच मुलींच्या खांद्यावर निघालेल्या या अंत्ययात्रेत अनेकजण सहभागी होते.

याविषयी अधिक माहिती अशी की, नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथील पुरुषोत्तम चंदुलाल खंडेलवाल (72 रा.बजाजनगर) हे 25 वर्षापुर्वी पोटाची खळगी भरण्यासाठी अर्धागिनी मीना आणि रेखा, राखी, राणी, आरती व पुजा या मुलींसोबत बजाजनगरात आले होते. आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने तसेच पाचही मुलीच असल्याने पुरुषोत्तम खंडेलवाल यांनी न डगमगता कापड विक्रीचा व्यवसाय सुरु केला. सायकलवरुन बजाजनगर व परिसरात दिवसभर कपडे विकुन पुरुषोत्तम खंडेलवाल हे कुटुंबाची उपजिवीका भागवित होते. मुलगा नसल्याची खंत न बाळगळता पुरुषोत्तम खंडेलवाल यांनी मुलींच माझे स्वप्न पुर्ण करतील, अशी आशा बाळगत खडतर परिश्रम घेत मुलींना पदवीपर्यंतचे शिक्षण दिले. सर्व मुलीं उच्चशिक्षीत झाल्यानंतर खंडेलवाल यांनी कपडे विक्रीतुन केलेल्या कष्टाईच्या कमाईतुन या पाचही मुलींचे लग्न लावुन दिले. मुली सासरी केल्यानंतर तसेच वयोमनानुसार कष्टाचे काम करता येत नसले तर त्यांनी आपला व्यवसाय सुरुच ठेवला होता.

अशातच 9 वर्षापुर्वी आजारी पडल्यानंतर पुरुषोत्तम खंडेलवाल हे घरातच पडून होते. पतीच्या आजारपणात अर्धागिनी मिना खंडेलवाल व मुलगी राणी या दोघांनी त्यांची देखभाल केली. आजारपणातही पुरुषोत्तम खंडेलवाल हे पत्नी मीना व मुलगी राणी यांच्या मदतीने दैनंदिन कामकाज करीत होते. मात्र काल सकाळी 8 वाजेच्या सुमारास मुलगी राणीस, मला दुधाचा कपआणून दे, तोपर्यंत मी फ्रेश होतो, असे म्हणून पुरुषोत्तम खंडेलवाल बाथरुमला गेले. बराचवेळ झाला तरी वडील बाहेर आले नाही. यामुळे शेजाऱ्यांच्या मदतीने मुलगी राणीने बाथरुमचा दरवाजा तोडला. यावेळी पुरुषोत्तम खंडेलवाल यानाचा मृत्यू झाल्याचे लक्षात आले. यानंतर राणी यांनी नातेवाईक व छत्तीसगड, ओरीसा व शहरात असलेल्या दोन्ही बहिणींना वडीलांचे छत्र हरपल्याची माहिती दिली.

पुरुषोत्तम खंडेलवाल यांच्या ओरीसा व छत्तीसगड मध्ये वास्तव्यास असणाऱ्या दोन्ही मुली आज गुरुवारी पहाटे बजाजनगरात पोहचल्या. सर्व पाचही मुली वडिलांना अखेरचा निरोप देण्यासाठी आल्यानंतर नातेवाईक व शेजाऱ्यांनी अंत्यसंस्काराची तयारी सुरु केली होती. या पाचही मुलींनी धार्मिक प्रथेला फाटा देत जन्मदात्याच्या पार्थिवाला खांदा देण्याचा निर्णय घेतला. तसेच पाचही मुली स्मशानभुमीपर्यंत गेल्या. यानंतर नातू तेजस खंडेलवाल याने आजोबांना अग्नीडाग दिला.