हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । श्री संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातर्फे शैक्षणिक सत्र २०२५-२६ पासून घेतल्या जाणाऱ्या परिक्षेदरम्यान सर्व शाखांचे पेपर सोडविण्यासाठी स्तनदा माता विद्यार्थीनींना ज्यादाचा २० मिनिटे अवधी देण्याचा, तसेच स्तनपानासाठी स्तनदामाता, विद्याथींनीकरिता स्वतंत्र कक्ष अथवा हिरकणी कक्ष स्थानप करण्याचा निर्णय विद्यापीठ प्रशासनाने घेतला आहे. कुलगुरू डॉ. मिलिंद बारापत्रे यांनी यासंदर्भातील परिपत्रक निर्गमित केले आहे. सिनेट सदस्य अमोल देशमुख यांनी या संदर्भातील प्रस्ताव मांडला होता. त्या प्रस्तावाला विद्यापीठाने मान्यता देत वरील निर्णय घेतला आहे.
तस बघितली तर अलीकडच्या काळात शैक्षणिक क्षेत्रात मुलींनी मोठी झेप घेतली आहे. मुलींचा शिक्षणाबाबतचा टक्का दिवसेंदिवस वाढतच आहे. विवाहानंतर देखील मुली, स्त्रिया शिक्षण अविरतपणे सुरू ठेवतात. परंतू गरोदरपणा, प्रसूतीनंतर मात्र त्यांना अनेक मर्यादा येतात. दरम्यानच्या कालावधीत त्यांना शैक्षणिक अर्हता वाढविण्याकरीता विद्यापीठाच्या अनेक परिक्षा द्यावयाच्या असतात. परंतु अनेक स्तनदा मातांचे बाळ लहान असल्यामुळे त्यांना विविध अभ्यासक्रमाचे पेपर सोडविण्याकरीता मोठ्या अडचणीचा सामना करावा लागतो. त्यांना आपला पाल्य दोन-तीन वर्षाचा होईस्तोवर वाटच बघावी लागते. त्यामूळे लग्न झालेल्या मुलींच्या शिक्षणात दोन-तीन वर्षांचा खंड पडत होता.
यावर ठोस उपाय करण्यासाठी युवा सिनेट सदस्य अमोल देशमुख यांनी तसा प्रस्ताव तयार सिनेट सभागृहासमोर ठेवला. सभागृहाने प्रस्तावाला सहमती दर्शवून पुढील मंजुरीकरीता तो परीक्षा व मूल्यमापन मंडळाकडे पाठविला. परीक्षा मंडळाने समिती स्थापित करून त्यांच्या अहवालानुसार प्रस्तावाची रचना केली होती. विद्यापीठाचे अधीसभा सदस्य अमोल देशमुख यांच्या प्रस्तावावरून विद्यापीठाने घेतलेल्या या निर्णयाचा भविष्यात हजारो विद्यार्थिनींना त्यांच्या शैक्षणिक वाटचालीत फार मोठा फायदा होणार आहे.




