कोल्हापूर | बहुप्रतीक्षित गोकुळ दूध संघाची मतमोजणी सुरू झाली असून गोकुळ दूध संघावर कुणाची सत्ता येणार हे दुपारपर्यंत कळणार आहे. गोकुळसाठी रविवारी चुरशीने 99.78 टक्के इतकं झालं आहे. पालकमंत्री सतेज पाटील यांच्या विरोधी राजर्षी शाहू शेतकरी आघाडीचे सुजित मिनचेकर 346 आणि अमर पाटील 436 मतांनी विजयी झाले आहेत. तर महिला प्रवर्गात सत्ताधारी गटाच्या शोमिका महाडिक आणि विरोधी गटाच्या अंजना रेडेकर यांच्यात जोरदार चुरस सुरू आहे.
‘गोकुळ’च्या संचालकपदाच्या २१ जागांसाठी ४५ उमेदवार रिंगणात उतरले होते. आमदार पी. एन. पाटील, माजी आमदार महादेवराव महाडिक, ज्येष्ठ संचालक अरुण नरके, माजी खासदार धनंजय महाडिक यांच्या सत्तारूढ गटाविरोधात ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील, राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, खासदार संजय मंडलिक यांच्यासह इतर दिग्गज नेत्यांनी एकत्र येऊन मोट बांधली. त्यामुळे या निवडणुकीच्या निकालाबाबत प्रचंड उत्सुकता आहे. निवडणुकीसाठी एकूण तीन हजार ६४७ ठरावदारांपैकी तीन हजार ६३९ ठरावदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
या निवडणुकीच्या निमित्ताने सत्तारूढ राजर्षी शाहू आघाडी व विरोधी राजर्षी शाहू शेतकरी आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये टोकाची ईर्ष्या दिसून आली. या निवडणुकीची मतमोजणी आज सकाळी आठपासून रमणमळा येथील महसूल कल्याण निधीच्या सभागृहात सुरू झाली आहे. या निकालाबाबत जिल्ह्यात कमालीची उत्सुकता आहे. दुपारपर्यंत निकालाचा कल स्पष्ट होईल.