हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ब्रिटन मध्ये मोठी राजकीय उलथापालथ होऊन पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यांच्याच सरकार मधील ४० पेक्षा जास्त खासदार आणि मंत्र्यांनी राजीनामे दिल्यानंतर बोरिस जॉन्सन यांना पंतप्रधान पदावरून पायउतार व्हावं लागलं. बोरिस जॉन्सन यांच्यानंतर ब्रिटनचे पुढचे पंतप्रधान म्हणून भारतीय वंशाचे ऋषी सुनक हे प्रबळ दावेदार मानले जात आहे.
४२ वर्षीय ऋषी सुनक हे इन्फोसिसचे सहसंस्थापक आणि ज्येष्ठ उद्योगपती नारायण मूर्ती यांचे जावई आहेत. बोरिस जॉनसन यांनी फेब्रुवारी २०२० मध्ये सुनक यांची अर्थमंत्री पदी निवड केली होती. या वर्षी जानेवारीच्या सुरुवातीला, एका आघाडीच्या ब्रिटीश बुकीने देखील भाकीत केले होते की बोरिस जॉन्सन लवकरच राजीनामा देऊ शकतात आणि ऋषी सुनक त्यांच्या जागी नवीन पंतप्रधान होऊ शकतात.
ऋषी सुनक यांचा जन्म आणि सुरुवातीचे जीवन-
ऋषी सुनक यांचे आई-वडील भारतीय वंशाचे होते. त्यांचे वडील यशवीर यांचा जन्म केनियामध्ये झाला आणि आई उषा यांचा जन्म टांझानियामध्ये झाला. ऋषीच्या आजोबांचा जन्म पंजाब प्रांतात (ब्रिटिश भारत) झाला. ते नंतर 1960 च्या दशकात आपल्या मुलांसह ब्रिटनमध्ये स्थलांतरित झाले. ऋषी यांचा जन्म 12 मे 1980 रोजी साउथम्प्टन, यूके येथे झाला. त्याचे वडील डॉक्टर होते तर आई दवाखाना चालवायची. ऋषी तीन भावंडांमध्ये सर्वात मोठे आहेत.
ऋषी सुनक यांचे शिक्षण आणि कारकीर्द-
ऋषी सुनक यांचा जन्म यूकेमधील साउथॅम्प्टन येथे झाला. त्यांनी यूकेच्या विंचेस्टर कॉलेजमधून राज्यशास्त्राचे शिक्षण घेतले. यानंतर त्यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठात प्रवेश घेऊन तत्त्वज्ञान आणि अर्थशास्त्राचा अभ्यास केला. ऋषी सुनक स्टॅनफोर्ड विद्यापीठात फुलब्राइट स्कॉलर होते, जिथून त्यांनी एमबीए केले. ऋषी सुनक यांनी ग्रॅज्युएशननंतर गोल्डमन सॅक्समध्ये काम केले आणि नंतर हेज फंड फर्ममध्ये पार्टनर बनले.
स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीमध्ये एमबीए करताना त्यांची भेट इन्फोसिसचे सह-संस्थापक आणि ज्येष्ठ उद्योगपती नारायण मूर्ती यांची मुलगी अक्षता मूर्तीशी झाली, ज्यांच्याशी त्यांनी नंतर लग्न केले. त्यांना कृष्णा आणि अनुष्का या दोन मुली आहेत.
राजकारणात प्रवेश-
ऋषी सुनक 2015 मध्ये खासदार म्हणून पहिल्यांदा संसदेत पोहोचले. त्यावेळी ब्रेक्झिटला पाठिंबा दिल्यामुळे पक्षात त्यांचा दर्जा वाढत गेला. ऋषी यांनी तत्कालीन ब्रिटिश पंतप्रधान थेरेसा मे यांच्या मंत्रिमंडळात कनिष्ठ मंत्री म्हणून काम केले होते. कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे युवा नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे नेहमीच पाहिले जात असे. पक्षातील अनेक बडे नेते त्यांचे वारंवार कौतुक करत आहेत. ऋषी सुनक हे एकआकर्षक व्यक्तिमत्व असून त्यांना डिश ऋषी या टोपण नावानेही ओळखले जाते.