Wednesday, February 8, 2023

ब्रिटिशकालीन पिंगळी तलाव मोजतोय अखेरच्या घटका…

- Advertisement -

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील दहिवडी, पिंगळी, गोंदवले व वाघमोडेवाडी या गावांसाठी वरदान ठरलेल्या माण पिंगळी येथील ब्रिटिशकालीन तलावाचे अस्तित्व धोक्यात आले आहे. तालुक्यातील या तलावाकडे पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने परिसरातील गावांसाठी ही धोक्याची घंटा मानली जात आहे.

- Advertisement -

पिंगळी येथील ब्रिटिशकालीन तलावाच्या भराव्यावर काटेरी झाडे झुडपे यांची झालेली मोठ्या प्रमाणात वाढ, तलावातील पाण्याची भराव्या खालून होणारी गळती, संरक्षक कठड्यावर वाढलेली झाडे, विना परवाना घेण्यात आलेल्या तलावातील विहीरी शेजारीच असलेल्या मेष पालन केंद्राचे वाढते अतिक्रमण व त्यांनी काढलेली बोरवेल, तलावाच्या देण्यात आलेल्या भाडे पट्टा करार जागा व अनधिकृत बांधकामे यामुळे तलावाचे अस्तित्वच धोक्यात आलं आहे.

ब्रिटिशकालीन तलावाची ही बदलती भयावह परिस्थिती लक्षात घेता भविष्यात दहिवडी, पिंगळी, गोंदवले व वाघमोडेवाडी या गावातील लोकांना शेतीच्या व पिण्याच्या पाण्याच्या समस्येचा फार मोठा सामना करावा लागेल. तसेच पिंगळी पोट कालवे देखील अनेक ठिकाणी बुजवण्यात आले आहे. याकडे पाटकरी कर्मचारी यांचे दुर्लक्ष असल्याने अनेक ठिकाणी सांड पाणी सोडण्यासाठी दहिवडी नगरपंचायत याचा वापर करत असल्याचे दिसत आहे. यावर तात्काळ कारवाई करून पुन्हा एकदा या तलावाला व पोट कालव्याला जीवदान मिळावे, असे नागरिक अपेक्षा करत आहेत.