धक्कादायक! भावाला लोखंडी रॉडने जबर मारहाण; शेतीच्या वादातून घेतला जीव

अकोला : हॅलो महाराष्ट्र – सध्या ग्रामीण भागामध्ये पेरणीचे काम चालू आहे. त्यामध्येच अकोल्यातील लाखोंडा बुद्रुक या गावात एक धक्कादायक घटना घडली आहे. रविवारी दुपारच्या सुमारास हि घटना घडली आहे. अकोला जिल्ह्यात गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत चालली आहे.

काय आहे प्रकरण
राजेश मोतीराम भांडे व त्याचे चुलत भाऊ गणेश भानुदास भांडे तसेच उमेश उर्फ बंडू गोवर्धन भांडे यांच्यामध्ये शेतीच्या वादातून सतत खटके उडत होते. काल दुपारच्या वेळी यांच्यात पुन्हा एकदा वाद झाला. हा वाद एवढा टोकाला गेला कि गणेश भानुदास भांडे तसेच उमेश उर्फ बंडू गोवर्धन भांडे यांनी राजेश मोतीराम भांडे याच्यावर लोखंडी पाईपने जबर मारहाण करत प्राणघातक हल्ला केला. यामध्ये राजेश भांडे हे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने अकोला रुग्णालयात दाखल करण्यात आले. राजेश भांडे यांच्या दोन्ही पायावर गंभीर मार लागल्याने व अति रक्तस्राव झाल्याने त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

या घटनेची माहिती मिळताच अकोट फाईल पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यानंतर तपास केला असता दोन चुलत भावांनी राजेशला मारल्याची माहिती समजताच अकोट पोलिसांनी अवघ्या चार तासात आरोपी गणेश भानुदास भांडे तसेच उमेश उर्फ बंडू गोवर्धन भांडे यांना अटक केली आहे. हि कारवाई अकोला पोलीस अधीक्षक श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन कदम यांच्या मार्गदर्शना खाली अकोट फाईल पोलीस स्टेशनचे ठाणेदार नितीन सुशिर, छोटू पवार, राहुल चव्हाण, असलम शहा, श्याम आठवले यांनी केली आहे.