Tuesday, June 6, 2023

बहिणीच्या लग्नासाठी कपडे खरेदीसाठी जाताना भावाचा अपघातात मृत्यू

खंडाळा | बहिणीचे लग्नाच्या निमित्ताने पुण्यामध्ये कपडे खरेदी करण्यासाठी निघालेल्या तरुणाचा पुणे- सातारा महामार्गावर केळवडे फाट्यावर झालेल्या अपघातात जागीच मृत्यू झाला. तर त्याचा मित्र जखमी झाला आहे. अजय रामचंद्र पिलावरे (वय- 24, रा. शिंदेवाडी ता. खंडाळा सातारा) असे अपघातात मृत्यु झालेल्या तरुणाचे नाव असून त्याचा मित्र गौरव हिरामण जाधव हा जखमी आहे.

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, अजय पिलावरे याच्या बहिणीचे येत्या 6 जूनला लग्न असून त्यानिमित्ताने स्वतःच्या व घरातील मंडळीचे कपडे खरेदी करण्यासाठी त्याचा मित्र गौरव समवेत ते पुण्याला दुचाकी (क्र. एम एच- 11 सी एल – 5265) वरून निघाले होते. यावेळी गॅस टाकीने भरलेला ट्रक (क्र. एम एच- 11- सीएच- 6942) महामार्गावरून जात असताना इंडिकेटर न लावता ट्रक अचानक सेवा रस्त्याला वळविला. यावेळी पाठीमागून येणारी दुचाकी ट्रकच्या मधोमध जोरदार धडकली. यात अजय याचा मृत्यू झाला. तर गौरव जखमी झाला.

यावेळी प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी जखमींना नसरापूर येथील सिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेले होते. मात्र, दोघांची प्रकृती गंभीर असल्याने पुणे येथील भारती हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेत असताना यात अजय पिलावरे याचा मृत्यू झाला. या बाबत अप्पासो मळेकर (रा. शिंदेवाडी) यांनी फिर्याद दिली असुन त्या नुसार राजगड पोलिसांनी ट्रक चालक सुरेंद्र शंकर जाधव (रा. तळदेव महाबळेश्वर) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.