अर्थसंकल्प 2022 : राज्य सरकारने केल्या ‘या’ महत्त्वाच्या घोषणा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आज राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत अर्थसंकल्प सादर केला. यावेळी सरकार कडून विविध घोषणा करण्यात आल्या आहेत. या अर्थसंकल्पातून विकासाची पंचसूत्री मांडण्यात आली असून अर्थ संकल्पातून आरोग्यावर अधिक भर देण्यात आला आहे. तसेच राज्यातील विविध महामंडळांसाठी भरीव तरतूदही करण्यात आली आहे.

काय आहेत महत्त्वाच्या घोषणा-

1)विकासाची पंचसूत्री

कृषी,आरोग्य,मनुष्यबळ विकास, दळणवळण आणि उद्योग या क्षेत्रांसाठी 1 लाख 15 हजार 215 कोटी रुपयांचा नियतव्यय प्रस्तावित असून येत्या तीन वर्षांत 4 लाख कोटी रूपये उपलब्ध करुन देणार. कृषी व संलग्न क्षेत्रांसाठी 23 हजार 888 कोटी तरतुद.आरोग्य क्षेत्रासाठी 5 हजार 244 कोटी रुपये तरतुद.मानव व मनुष्यबळ विकासासाठी 46 हजार 667 कोटी तरतुद.पायाभूत सुविधा व वाहतूकीसाठी 28 हजार 605 कोटी तरतुद.उद्योग व उर्जा विभागासाठी 10 हजार 111 कोटीची तरतुद सरकार कडून करण्यात आली आहे.

2) CNG स्वस्त होणार

सरकार कडून सीएनजी वरील कर १३.५ टक्क्यावरुन ३ टक्क्यावर आणण्यात आला आहे. त्यामुळे सीएनजी स्वस्त होणार आहे. नैसर्गिक वायूचा वापर वाढवण्याच्या दृष्टीने घरगुती पाईप गॅस, सीएनजीवर चालणारी वाहने, याचा वापर वाढावा. पर्यावरण पूरक नैसर्गिक वायूच्या वापरास प्रोत्साहन आणि सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला. दरम्यान यामुळे राज्याच्या तिजोरीत अंदाजे ८०० कोटी रुपयांची महसुली घट होणार आहे.

3) संभाजी राजेंच्या स्मारकासाठी 250 कोटी
छत्रपती संभाजी महाराजांचं भव्य स्मारक हवेली येथे उभारण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याचं अजित पवार म्हणाले. त्यासाठी २५० कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. राज्यात असामान्य शौर्य गाजवणाऱ्या नागरिकांसाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने शौर्य पुरस्कार देण्यात येणार आहे”, अशी देखील घोषणा अजित पवार यांनी यावेळी केली.

4) नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजाराचं अनुदान
नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजाराचं प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा निर्णय अजित पवार यांनी जाहीर केला. याचा फायदा राज्यातील २० लाख शेतकऱ्यांना होईल. त्याकरता २०२२-२३ मध्ये १०,००० कोटी खर्च अपेक्षित आहे. भूविकास बँकेच्या ३४, ७८८ कर्जदार शेतकऱ्यांची ९६४ कोटी १५ लाख रुपयांची कर्जमाफी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

5) तीन मोबाईल प्रयोगशाळा
देशी गायी, म्हशींची उत्पादकता वाढवण्यासाठी विदर्भ, मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्रासाठी प्रत्येकी एक, अशा एकूण तीन मोबाईल प्रयोगशाळा

6) समृद्धी महामार्गाचा विस्तार करणार-
हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृध्दी महामार्गाचा नागपूर ते भंडारा-गोंदिया,नागपूर ते गडचिरोली असा विस्तार करणार अशी घोषणा अजित पवार यांनी केली.

7) महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या 3000 नवीन बसगाड्या व 103 बसस्थानकांच्या आधुनिकीकरण यासाठी भांडवली अर्थसहाय्य करणार. शिर्डी ,रत्नागिरी , अमरावती व कोल्हापूर विमानतळाची कामे गडचिरोलीला नवीन विमानतळ. मुख्यमंत्री ग्राम सडक योजना टप्पा-2 अंतर्गत 10 हजार किमी लांबीच्या रस्त्याकरिता 7500 कोटींची तरतूद

8) मॅग्नेटिक महाराष्ट्र 2.0 अंतर्गत रोजगाराच्या 3 लाख 30 हजार नवीन संधी मिळणार. तसेच मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत 1 लाख रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार

9) प्रत्येकी 100 खाटांची स्त्री रुग्णालये स्थापन करणार
हिंगोली, यवतमाळ, बुलढाणा, सांगली , सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, वर्धा, भंडारा, जळगाव, अहमदनगर, धुळे, सोलापूर ,रत्नागिरी, औरंगाबाद आणि रायगड येथे प्रत्येकी 100 खाटांची स्त्री रुग्णालये स्थापन करणार.

10) स्थानिक स्वराज्य संस्थांमधील इतर मागासवर्गीय समाजाचे प्रतिनिधीत्व निश्चित करण्यासाठी नवीन समर्पित मागासवर्गीय आयोगाची स्थापना करणार अशी घोषणा अजित पवार यांनी केली. तसेच बार्टी, सारथी, महाज्योती या संस्थाना विविध विकास योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी प्रत्येकी 250 कोटी रूपये तरतूद करण्यात आली आहे.

Leave a Comment