नवी दिल्ली । देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज लोकसभेत अर्थसंकल्प सादर केला. निर्मला सीतारामन यांचा हा चौथा तर मोदी सरकारचा १० वा अर्थसंकल्प आहे. देशात कोरोना महामारीतुन देश आत्ता कुठे बाहेर पडत असून अर्थमंत्र्यांनी आज अनेक घोषणा करत सर्वसामान्याना दिलासा देण्याचा प्रयत्न केला.
कर का वाढवला नाही ?
“आम्ही कर वाढवला नाही. अतिरिक्त कर देऊन एक पैसाही मिळवण्याचा प्रयत्न केला नाही. तूट कितीही असली तरी महामारीच्या काळात जनतेवर कराचा बोजा लादू नका, असा गेल्या वेळी पंतप्रधानांचा आदेश होता. यावेळीही तशाच सूचना देण्यात आल्या होत्या.”अर्थमंत्र्यांनी सांगितले.
कर न वाढवण्याचा मोठा दिलासा – अर्थमंत्री
केंद्रीय अर्थसंकल्प सादर केल्यानंतर अर्थमंत्र्यांनी सांगितले की,”कर न वाढवणे हा सर्वात मोठा दिलासा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कर वाढवण्याच्या बाजूने नव्हते. गेल्या वर्षी आणि या वर्षीही कर वाढवून एक पैसाही कमावण्याचा प्रयत्न केला गेला नाही. गेल्या वर्षीप्रमाणे महामारीच्या वेळी जनतेवर बोझा पडू नये, असा पंतप्रधानांचा आदेश होता. यंदाही तसेच होते. यंदाही आम्ही करात कोणतीही वाढ केलेली नाही.”
देशात प्रथमच पर्वतमाला योजना सुरू – पंतप्रधान मोदी
अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, देशात प्रथमच हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि जम्मू-काश्मीरसह ईशान्येकडील राज्यांसाठी पर्वतमाला योजना सुरू करण्यात येत आहे. त्यामुळे या राज्यांमध्ये आधुनिक वाहतूक व्यवस्था, कनेक्टिव्हिटी पायाभूत सुविधा निर्माण होतील आणि सीमावर्ती गावे मजबूत होतील.
उद्या सकाळी 11 वाजता अर्थसंकल्पाबाबत बोलू – पंतप्रधान मोदी
बुधवारी भारतीय जनता पक्षाच्या एका कार्यक्रमात मी अर्थसंकल्पाबाबत माझे म्हणणे मांडणार असून त्यात अर्थसंकल्पाशी संबंधित इतर गोष्टींवर माझे म्हणणे मांडणार असल्याचे पीएम मोदी म्हणाले. या अर्थसंकल्पाचे प्रत्येक क्षेत्राने स्वागत केले असून, प्रत्येक गावात इंटरनेट पोहोचवण्यास या अर्थसंकल्पाची मदत होईल, असेही ते म्हणाले.