Budget 2025-26| उपमुख्यमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी आज अर्थसंकल्पीय अधिवेशनात 2025 -26 या आर्थिक वर्षासाठीचे अर्थसंकल्प सादर केले आहे. या अर्थसंकल्पामध्ये त्यांनी महाराष्ट्राच्या औद्योगिक आणि सागरी विकासासंदर्भात मोठ्या घोषणा करत राज्याच्या प्रगतीला नवा वेग देण्याचा संकल्प व्यक्त केला आहे.
राज्याच्या आगामी औद्योगिक धोरणाची घोषणा करताना अजित पवार यांनी सांगितले की, “औद्योगिक धोरण 2025 लवकरच जाहीर करण्यात येणार असून त्याअंतर्गत 20 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आणि 50 लाख रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. औद्योगिक क्षेत्रात अधिक गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी सरकार नवे कामगार नियम तयार करणार असून, चक्रीय अर्थव्यवस्थेसाठी स्वतंत्र क्षेत्रीय धोरण लागू करण्याचाही सरकारचा मानस आहे.”
त्याचबरोबर, “औद्योगिक धोरणाच्या माध्यमातून राज्यातील विविध क्षेत्रांमध्ये उद्योगधंदे वाढवले जातील. यासोबत रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील. नव्या धोरणामुळे महाराष्ट्र देशातील आघाडीचे औद्योगिक राज्य म्हणून अधिक सक्षमपणे पुढे येईल” असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.
वाढवण बंदर विकासासाठी मोठी गुंतवणूक (Budget 2025-26)
यावेळी, औद्योगिक धोरणासोबतच अजित पवार यांनी राज्यातील सागरी वाहतूक क्षेत्रासाठी महत्त्वाच्या वाढवण बंदर विकास प्रकल्पाची माहिती दिली. त्यांनी सांगितलेकी, जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण आणि महाराष्ट्र सागरी मंडळ संयुक्तरीत्या पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदर विकसित करणार आहेत. या प्रकल्पासाठी 76,220 कोटी रुपयांची भव्य गुंतवणूक करण्यात येणार आहेत, राज्य सरकारचा त्यात 26% सहभाग असेल. वाढवण बंदराच्या माध्यमातून दरवर्षी 300 दशलक्ष मेट्रिक टन मालवाहतूक करण्याची क्षमता निर्माण केली जाणार आहे.
दरम्यान, सन 2030 पर्यंत वाढवण बंदरातून मालवाहतूक सुरू होण्याचा अंदाज आहे. (Budget 2025-26) त्यामुळे हे बंदर जागतिक स्तरावर कंटेनर हाताळणाऱ्या पहिल्या दहा बंदरांमध्ये स्थान मिळवेल. त्यामुळे महाराष्ट्र सागरी वाहतुकीतील एक महत्त्वाची महासत्ता म्हणून उदयास येईल. या बंदराच्या विकासासोबतच अजित पवार यांनी आणखी एका महत्त्वाच्या योजनेची घोषणा केली आहे. अजित पवार यांनी माहिती दिली की, वाढवण बंदराजवळ मुंबईसाठी तिसरे विमानतळ उभारले जाईल. याच परिसरात मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचे स्थानक असेल.