सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
साताऱ्यातील कराड तालुक्यातील येरवळे जुने गावठाण येथे चक्क म्हैसीला पांढरे शुभ्र रेडकू झाल्याची आश्चर्यकारक घटना घडली आहे. हा चमत्कार पाहण्यासाठी येरवळेसह परिसरातील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने गर्दी केलीये. पांढऱ्या रेडकाला पाहून म्हशीचे मालक नितीन मोहिते आणि त्यांच्या कुटुंबीयांनाही आश्चर्याचा धक्का बसला.
काळ्याभोर म्हशीला काळेच रेडकू होत असते मात्र येरवळे जुने गावठाण येथील नितीन मोहिते यांच्या काळ्याभोर म्हशीला मात्र नुकतेच पांढरे शुभ्र रेडकू झाल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. हे रेडकू पूर्णपणे पांढरे शुभ्र असून ते गायीच्या वासरा सारखे दिसते आहे. ही एक दुर्मिळ बाब असून अपवादात्मक अशा प्रकारची घटना घडलीये..
विशेष म्हणजे हे रेडकू अगदी पांढरे शुभ्र असून चांगले ठणठणीत आहे. काळ्याभोर म्हशीला पांढरे शुभ्र रेडकू झाल्यामुळे नितीन मोहिते आणि त्यांच्या कुटुंबीयांनाही अचंबित केलं आहे. म्हशीला चुकून गायीचे इंजेक्शन दिले गेले असल्यास असा दुर्मिळ प्रकार घडू शकतो असे डॉक्टरांचे मत आहे. या पांढऱ्या शुभ्र रेडकाला पाहण्यासाठी येरवळे सह परिसरातील ग्रामस्थांची गर्दी होत आहे.