सातारा प्रतिनिधी । साताऱ्यामध्ये स्वतःवरच गोळी झाडून घेत एका व्यक्तीने आत्महत्या केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. संतोष जयसिंग शिंदे असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. मृत शिंदे हे बांधकाम व्यावसायिक असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. शाहूपुरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली असून या घटनेमुळे शिवाजीनगर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
दरम्यान या घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. शिंदे यांच्या आत्महत्येमागचे नेमके कारण समजू शकले नसले तरी घरगुती कारणावरुन त्यांनी स्वत:वर गोळी झाडुन घेतली असावी असा प्राथमिक अंदाज पोलीस व्यक्त करत आहेत. सध्या त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.
या घटनेची माहिती मिळताच शिंदे यांच्या मित्रपरिवाराने आणि नातेवाईकांनी मोठ्या प्रमाणात रुग्णालयात गर्दी केली. मात्र शिंदे यांच्या अशा पद्धतीने अचानक जाण्याने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सध्या पोलीस घटनेचा कसून तपास करत आहेत. या संबधी काही लोकांची चौकशी करण्यात येणार असल्याचे देखील पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.