हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । घाटाखालचा आणि घाटावरचा हा बुलढाण्याचा (Buldana) नेहमीचा संघर्ष. खरंतर काँग्रेसचं वर्चस्व असणाऱ्या या जिल्ह्याला भाजपने अनेक अंगांनी डॅमेज केलं.. त्यात खामगाव आणि जळगाव – जामोदचे मतदारसंघ भाजपने असे घट्ट विणले की इथं विरोधकांना नो एण्ट्री असं एकूण वातावरण असतं.. संजय रायमुलकर, आकाश फुंडकर आणि जिल्ह्याच्या राजकारणात बीग बी ठरलेले संजय कुटे यांच्या राजकाराचा बेस याच मतदारसंघातून मजबूत झालाय.. त्यामुळे तुपकर इफेक्टमुळे महायुतीच्या बाजूने बुलढाण्याचा निकाल गेला.. असं म्हणलं जात असताना महायुतीचे बालेकिल्ले असणारे मेहकर, खामगाव आणि जळगाव – जामोदचा यंदाचा निकाल कसा लागतोय? बुलढाण्यातील या हायव्होल्टेज लढतीत आमदारकीचा गुलाल कुणाचा… याचंच हे क्लिअर कट एनालिसीस..
पहिला विधानसभा मतदारसंघ पाहुयात तो मेहकराचा… मेहकर विधानसभा मतदारसंघाला शिवसेनेचा प्रतापगड म्हटला जातो.. कारण इथली शिवसेनेची पकड इतकी मजबूत आहे की विरोधक केवळ नाममात्रच राहतात.. या प्रतापगडाचे म्हणजेच मेहकर विधानसभेचे किल्लेदार, आमदार आहेत संजय रायमुलकर.. अनुसुचित जातीसाठी राखीव असणाऱ्या या मतदारसंघात रायमुलकर यांनी सलग तीन टर्म मोठ्या लीडनं आमदारकी आपल्याकडे ठेवून मतदारसंघात नवा विक्रम केलाय..२०१४ ला काँग्रेसचे लक्ष्मणराव घुमरे तर २०१९ ला अनंत वानखेडे यांना अस्मान दाखवत मेहकरवर भगवाच फडकवत ठेवला.. विशेष म्हणजे अनुसुचित जातीसाठी मतदारसंघ राखीव असतानाही मावळत्या विधानसभेला वंचितच्या उमेदवाराला इथे फक्त ८००० मतच पदरात पाडून घेता आली.. यावरुन शिवसेनेवर मेहकरची किती मेहरबानी आहे, हे वेगळ्या शब्दात सांगायला नको… पण याच रायमुलकरांनी शिवसेनेच्या बंडाळीत शिंदेंची साथ धरल्यानं मेहकर मधला कार्यक्रम चांगलाच गंडलाय. याचच फळ म्हणून ज्या रायमुलकरांनी १५ वर्ष आमदारकी भोगली त्या मेहकरमधून अवघं २७३ मतांचं लीड खासदार साहेब जाधवांच्या पाठीशी आलंय..
हा आकडा सांगतोय, की येणाऱ्या विधानसभेला रायमुलकरांची आमदारकी काठावर आलीय… इथं तुपकरांना मिळालेलं मतदान पाहता आणि त्यांनी मेहकर मधून स्वतंत्र उमेदवार उतरविण्याचा निर्णय घेऊन युती आणि आघाडी अशा दोघांचंही टेन्शन वाढवलय…तूपकरांचा हा संभाव्य धोका पाहता रायमुलकरही चांगलेच तयारीला लागलेत… अर्थसंकल्पीय अधिवेशनातून 109 कोटी 74 लाख रुपयांचा भरीव निधी मेहकर विधानसभा मतदारसंघासाठी मंजूर करून आणलाय.. अर्थात अवघ्या काही महिन्यांवर आलेल्या निवडणुकीला रायमुरकरांनाही पंधरा वर्षांचा हिशोब द्यायचाय… लोकसभेला तुपकर फॅक्टरमुळे मतदारसंघातून मशाल विझली आणि मत विभाजन प्रतापराव जाधवांच्या पथ्यावर पडलं… त्यामुळे मेहकरमध्ये येणाऱ्या विधानसभेला तुपकरांचा उमेदवार जिंकण्यासाठी लढणार… की मत विभाजनासाठी…याचे चित्र येणाऱ्या काळात स्पष्ट होईलच…
दुसरा मतदारसंघ येतो तो खामगावचा…2014 च्या विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदींनी खामगावमध्ये घेतलेल्या प्रचार सभेत, खामगाव जिल्हा झाला का? खामगाव – जालना रेल्वे महामार्ग झाला का? जिगावाचे काय झाले.. मुख्यमंत्री आले गेले.. अशी मराठीतली तीन वाक्य बोलून भावनिक साद घालत बुलडाणा जिल्ह्यातल्या खामगावच्या लोकांची मन जिंकली… खामगावकरांनीही मोदींच्या आवाहनाला भावनिक प्रतिसाद देत काँग्रेसच्या असणाऱ्या या बालेकिल्ल्यात आमदारकीचा चेहरा बदलला… आणि भाजपच्या आकाश फुंडकरांच्या स्वाधाीन मतदारसंघ केला.. खरंतर काँग्रेसच्या दिलीप सानंदा यांनी पंधरा वर्ष या मतदारसंघाचं प्रतिनीधीत्व करत काँग्रेसला जम बसवून दिला होता.. पण २०१४ ला सगळे पत्ते भाजपच्या बाजूने शिफ्ट झाले… २०१४ ला दिलीप सानंदा तर २०१९ ला ज्ञानेश्वर पाटलांना मात देत पुंडकर सलग दोन टर्म आमदार झाले…
आता यंदाही हॅट्रीक करण्यासाठी तेच महायुतीकडून निवडणुक मैदानात असतील… बाकी नुकत्याच पार पडलेल्य लोकसभेच्या तिरंगी लढतीत खामगावमधून महायुतीच्या उमेदवाराला म्हणजेच प्रतापराव जाधवांच्या पारड्यात तब्बल २० हजारांचं लीड असल्याने हीच मत त्यांच्या विजयात निर्णायक ठरली.. याच आकडेवारीवरुन मतदारसंघात आमदारकीला आकाश फुंडकर सेफ झोनमध्ये आहेत, असं म्हणायला हरकत नाही… दुसरीकडे दिलीप सानंदा हे भाजपमध्ये जाण्याच्या मध्यंतरी बऱ्याच वावड्या उठल्या पण लोकसभा उरकताच दिलीप सानंदा एक्टीव्ह मोडमध्ये आले आहेत.. कारण खामगावला स्वतंत्र जिल्हा, लाखनवाड्याला स्वतंत्र्य तालुक्याचा दर्जा देण्यासाठी सानंदा यांनी नुकतीच मुख्यमंत्र्यांची भेट घेत मागणी केली आहे… त्यामुळे घाटाखालची ही सेपरेट आयडेंटीटी, प्रादेशिकतावाद पुढे करत सानंदा यंदा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे… त्यात मतदारसंघात रखेडलेले अनेक विकास प्रकल्प, कॉटन बेल्ट म्हणून ओळख असणाऱ्या खामगावमध्ये दिसणारा शुकशुकाट, चांदीची मोठी बाजारपेठ असणाऱ्या उद्योगाची झालेली अवकळा आणि मतदारसंघातील नागरिकांची रखडणारी प्रशासकीय कामं हे सगळं फुंडकर यांना मायनसमध्ये घेऊन जाणाराय.. पण लोकसभेचा निकाल जैसे थे राहीला तर आकाश फुंडकर यांच्या आमदारकीच्या हॅट्रीकचे चान्सेस सध्यातरी जास्त वाटतायत..
तिसरा आणि शेवटचा मतदारसंघ आहे तो जळगाव – जामोदचा… जळगाव जामोदमधील काँग्रेसमध्ये निवडणुक लढण्यासाठी एवढे उत्सुक असतात की त्यांच्यातल्या स्पर्धेमुळे भाजपचे संजय कुटे आरामात निवडून येतात, असं एकूण या मतदारसंघाचं गणित.. तसं बघायला गेलं तर हा काँग्रेसचा बालेकिल्ला… कृष्णराव इंगळे यांच्या पंधरा वर्षांच्या आमदारकीला आव्हान देत २००४ साली संजय कुटे पहिल्यांदा आमदार झाले.. यानंतर सलग पंधरा वर्ष त्यांनी भाजपचा झेंडा मतदारसंघातून खाली पडू दिला नाहीये… विशेष म्हणजे नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या बाजूने या मतदारसंघातून १४ हजारांचं लीड मिळाल्यामुळे जळगाव -जामोद आजही भाजपच्या बाजूने आहे, असं म्हणायला हरकत नाही..
२०१९ च्याही निवडणुकीत काँग्रेसच्या स्वाती वाकेकर यांच्या विरोधात एकतर्फी लढत देऊन कुटे यांनी तब्बल ३५ हजारांहून अधिकचं लीड घेतलं होतं… महाराष्ट्रात ज्यावेळी भाजपचे सर्वेसर्वा गोपीनाथ मुंडे होते, त्यावेळी भाऊसाहेब फुंडकर हे मुंडेंचे निकटवर्तीय होते. भाऊसाहेब फुंडकरांनीच संजय कुटेंना राजकारणात आणलं आणि फुंडकरांच्या निधनानंतर संजय कुटे बुलडाणा जिल्ह्याचे नेते बनले… जळगाव-जामोद मतदारसंघात ओबीसी समाज प्रभावशाली आहे आणि संजय कुटे याच समाजातून येतात. किंबहुना, भाऊसाहेब फुंडकरांनी हीच सामाजिक गणितं पाहून त्यांना पुढे आणलं, असं बोललं जातं… निवडणुकीचा काळ वगळता ते सर्वपक्षीय नेत्यांशी चांगले संबंध ठेवून असतात, त्यामुळे त्यांच्या इमेजला अद्यापतरी म्हणावा असा डॅमेज पोहचला नाहीये… तगडा प्रतिस्पर्धी नसणं, स्वच्छ प्रतीमा, फडणवीसांचे विश्वासू आणि विकासाच्या राजकारणावर भर देण्याचा प्रयत्न हे सगळं प्लसमध्ये जाणारे पाँईट पाहीले तर सलग पाचव्यांदा जळगाव – जामोदवर आमदारकीचा मोहर उमटवण्याचा रेकाॅर्ड कुटेंच्या नावावर होऊ शकतो..
एकूणच काय, तर बुलढाण्यातील महायुतीत मेहकर वगळता खामगाव आणि जळगाव – जामोद हे दोन्ही मतदारसंघ अजूनही सेफ झोनमध्ये आहेत.. काँग्रेसनं या मतदारसंघात वर्चस्व निर्माण करण्यासाठी फारसे प्रयत्न केलेले नाहीयेत..दुसला लीडरही या जिल्हयावर फारसा प्रभाव टाकत नसल्याने रविकांत तुपकरच या तीन मतदारसंघांच्या राजकारणाला काहीतरी इंटरेस्टींग वळणावर नेऊन पोहचवतील, असंही सध्या वातावरण दिसतंय.. बाकी या तीन विधानसभा मतदारसंघात विधानसभेचं चित्र कसं असेल? ते आम्हाला कमेट बाॅक्समध्ये नक्की सांगा..