डोळ्यादेखत चोरी : ट्रायल घ्यायला गेला तो बुलेटसह गायब

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

फलटण | चोरटे कधी काय शक्कल लढवतील हे सांगता येत नाही. चोरी डोळ्यादेखत ही होवू शकते, यांचा प्रत्यय फलटणमधील एका गाडी विक्री व्यवसायिकास आला आहे. चक्क बुलेट खरेदी करण्यासाठी आलेल्या गिऱ्हाईकाने ट्रायल घेण्यासाठी जातो म्हणून गेला, ते बुलेट घेवून लंपास झाला आहे. याबाबतची फलटण शहर पोलिस ठाण्यात एका संशयिताविरूध्द तक्रार दाखल झाली आहे. सौरभ सावंत (रा. शिंदेवाडी ता. फलटण जि. सातारा), असे संशयिताचे नाव आहे.

फलटण पोलिसांनी दिलेली माहिती अशी, गिरीष सुरेश काटे (रा. फडतरवाडी ता. फलटण) यांना त्याच्या मालकीच्या बुलेट (क्र. एमएच- 12- एलबी- 9199) या दुचाकीची विक्री करायची होती. त्यासाठी त्यांनी मोटार मेकॅनिकल अजय अरुण खोमणे यांच्याकडे बुलेट विकण्यासाठी दिली होती. मेकॅनिक अजय खोमणे यांनी ओएलएक्सवर बुलेटचे फोटो व ती विकण्याबाबत जाहिरात दिली होती. दि. 23 मे 2022 रोजी दुपारी 1. 23 वाजण्याच्या सुमारास अजय खोमणे यांच्या मोबाईल क्रमांकावर फोन आला. मी सौरभ सावंत (रा. शिंदेवाडी) बोलत असल्याचे सांगितले. तुमची बुलेट मला आवडली असून मी घ्यायला तयार आहे.

त्यानुसार संशयिताने पत्ता घेतला. ही बुलेट फलटण येथील घडसोली मैदान, एच.डी.एफ.सी बँकसमोर दाखवण्याचे ठरले. ठरल्याप्रमाणे बुलेट घेऊन अजय खोमणे आले. त्यावेळेस सौरभ सावंत याने बुलेटची पाहणी करून, किंमत विचारली व मी एक ट्रायल मारून येतो व माझ्या मेकॅनिकलला बुलेट दाखवतो असे सांगून पृथ्वी चौकाकडे तो घेवून गेला. बराच वेळ झाला तरी तो परत न आल्याने अजय खोमणे यांनी त्याच्या मोबाईल नंबरवर बरेच फोन केले. परंतु त्याने फोन उचलला नाही व फोन बंद केला. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे खोमणे यांच्या लक्षात आले. त्यांनी तत्काळ याची माहिती गिरीष काटे यांना दिली. त्यांनी फलटण शहर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली.

Leave a Comment