सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
राज्यावर कोरोनाचे संकट आहे. तसेच कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. मात्र, नागरिकांना अद्यापही याबाबत गांभीर्य नसल्याचे दिसून येते. सातारा जिल्ह्यातील मायणी येथे प्रशासनाचे सर्व नियम धुडकावून बैल गाडी शर्यतीचे थाटात पार पडल्या. विशेष म्हणजे बैलगाडी शर्यतीला उच्च न्यायालयाने बंदी घातली असताना देखील ही शर्यत आयोजित करण्यात आली. याकडे मात्र, प्रशासनाकडूनही दुर्लक्ष केले जात आहे.
राज्यात बैलगाडी शर्यतींवर बंदी असताना देखील मायणी परिसरात बैलगाडी शर्यतींचा अक्षरशः धुरळा उडाल्याचे पाहायला मिळाले. लॉकडाऊनचे सर्व नियम धुडकावून हजारो नागरिक या ठिकाणी एकत्र आले होते. या ठिकाणी अजूनही बैलगाडी शर्यतींचे आयोजन केले जात आहे. यामध्ये लाखो रुपयांची उलाढाल होत असताना प्रशासन मात्र अजून ढिम्मच आहे.
एकीकडे सामान्य लोकांना प्रशासनाकडून लॉकडाऊनच्या नियमानाचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन केले जात आहे. तर दुसरीकडे अशा प्रकारच्या शर्यतींच्या माध्यमातून शेकडो लोक एकत्र येऊन सर्व नियम पायदळी तुडवत आहेत. विशेष म्हणजे मायणी पोलीस ठाण्यापासून अवघ्या 5 किमी अंतरावर पार पडणाऱ्या या शर्यतींकडे प्रशासन का दुर्लक्ष करत आहे? असा प्रश्न उपस्थित होत आहे.