कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने आज न्याय मिळाला आहे. सुप्रीम कोर्ट, वकिल, राजकीय पक्ष, आमदार, खासदार, मंत्री यांच्यासह संघटनाचा आभार. अखिल भारतीय बैलगाडी संघटना झटत आहे, त्याला आज यश आले. बैलगाडी शर्यती सुरू झाल्याने गोवंश वाचणार आहे. आमच्या घरी आज खरी दिवाळी असल्याची भावना बैलगाडी मालक धनाजी शिंदे यांनी व्यक्त केली.
सुप्रीम कोर्टाने बैलगाडी शर्यतीला सशर्त परवानगी दिल्यानंतर ठिकठिकाणी आनंदोत्सव साजरा करण्यात आला. सैदापूर- गोवारे येथील बैलगाडी मालक धनाजी शिंदे यांच्या घरी या निर्णयानंतर फटाके फोडून व गुलालाची उधळण करत आनंदोत्सव साजरा करण्यात आला. या निर्णयाने भावनिक वातावरण झालेले पहायला मिळाले. धनाजी शिंदे यांच्या निवासस्थानी बैलांना आणून पूजण्यात आले, तसेच गुलालात न्हावून टाकले होते. सातारा जिल्ह्यात अनेक ठिकाणी या निर्णयाचे जंगी स्वागत करण्यात आले. बैलगाडी मालकासोबत शर्यत शाैकिंनानीही आनंद व्यक्त केला.
कोर्टाच्या अटीचे बैल मालकांनी करावे : स्वाती शिंदे
बैलगाडी शर्यतीला परवानगी मिळाल्याने आपल्याला आनंद झाला असून गेल्या अनेक वर्षापासून आमची बैलं गुलालविना उभी होती. आता यापुढे आम्हांला गुलाल पहायला मिळणार आहे, तसेच बैलगाडी मालकांनी कोर्टाच्या निकाला मान राखून अटी व शर्तीचे पालन करून बैल शर्यतीत सहभागी करावे असे आवाहन स्वाती शिंदे यांनी केले.