सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
सातारा नगरपालिकेच्या वतीने पोवई नाका, मोती चौक आणि पंचपळे हौद या ठिकाणी कारवाई करून 11 खोकी हटवण्यात आली. यावेळी अतिक्रमण हटाव मोहिमेला विरोध करत काही खोकेधारकांनी आणि संघटनांनी पालिका कर्मचाऱ्यांवर दादागिरी करत वाद घातला. दंगा करणाऱ्यांना मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनी चांगलेच खडेबोल सुनावले आहे..
सातारा शहरात अतिक्रमणांनी मोठे हातपाय पसरले आहेत. प्रमुख रस्ते आणि चौकाचौकांमध्ये टपऱ्या, खोकी ,हातगडे यांचे प्रमाण वाढले आहे.. अतिक्रमणाने शहर विद्रूप झाले आहे त्यामुळे वाहतुकीच्या कोंडीचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. पोवई नाक्यावरील शिवाजी सर्कल येथे अतिक्रमणावर कारवाईला नगरपालिकेच्या वतीने सुरुवात करण्यात आली यावेळी काही संघटनांनी नगरपालिका पथकाला अटकाव केला.अतिक्रमणे काढू नयेत असे सांगत घोषणाबाजी केली. येव्हडच नव्हे तर यावेळी काहीजण नगरपालिकेच्या जेसीबीवर चढल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
जोपर्यंत बायोमेट्रिक सर्वे पूर्ण होत नाही किंवा आम्हाला ओळखपत्र मिळत नाही आणि योग्य ठिकाणी आमचं पुर्नवसन होत नाही तोपर्यंत आमच्या गड्याला हात लावायचा नाही असं कोर्टाने आदेश दिलेत तरीही अशा कारवाया करून गोरगरिबांवर अन्याय सुरु आहे असे एका खोके धारकाने म्हंटल. ४ दिवसात तुम्ही आमची दुसरीकडे सौय केली नाही तर आम्ही आहे इथेच गाड्या लावणार असा इशाराही त्यांनी दिला.
यावेळी संघटना आणि नगरपालिका कर्मचाऱ्यांमध्ये जोरदार वादावादी झाली. हा वाद नगरपालिका कार्यालयापर्यंत पोहोचल्यानंतर मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले. यावेळी बायोमेट्रिक सर्वे झालेल्या हॉकर्सधारकांना योग्य ठिकाणी जागा दिली जाईल असे सांगण्यात आले. शहरातील अतिक्रमण काढण्यासाठी पोलीस बंदोबस्तात कारवाई करण्याच्या हालचाली पालिकेने आता सुरू केल्या आहेत, त्यामुळे नगरपालिका आणि खोकेधारक असा वाद आणखी चिघळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.