सातारा | पुणे (Pune) – बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर रविवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास आनेवाडी टोल नाक्याजवळ असणाऱ्या उडतारे गावच्या हद्दीत शॉर्टसर्किटने चालत्या एसटी बसने पेट घेतला. यावेळी बसमध्ये प्रवासी प्रवास करत होते. सदरची बस पुण्याहून कोल्हापूरला निघाली होती.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, कोल्हापूरच्या दिशेने निघालेली एसटी क्रमांक (MH -09-FI- 0983) निघाली होती. चालकाने अचानक बसमधून धूर येऊ लागल्याने एसटी बाजूला घेतली. त्यानंतर अवघ्या काही वेळातच एसटीने पेट घेतला. यावेळी प्रवाशांना चालक व वाहक यांनी सुखरूप बसमधून खाली उतरल्याची माहिती आहे.
बसला लागलेली आग एवढी भीषण होती की एसटी संपूर्ण जळून जळून खाक झाली. या सर्व घटनेमुळे वाहतूक काही काळ ठप्प झाली. एसटी मधील प्रवासी सुखरूप असल्याची माहिती समोर आली आहे. बसला लागलेली आग विझविण्यासाठी अग्निशामक दलाच्या गाड्या तात्काळ घटनास्थळी पोहोचले होते. भोज पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली.