औरंगाबाद – औरंगाबाद विभागात संपात फूट पडताना दिसून येत आहे. काल दिवसभरात पैठण, गंगापूर आणि वैजापूर आगार सुरु झाले. या आगारातून 10 लालपरी प्रवाशांना घेवून मार्गस्थ झाल्या. तसेच औरंगाबाद आगारातूनही काल दिवसभरात सिल्लोड, कन्नड आणि जालन्यासाठी 14 बसेस धावल्या.
औरंगाबाद विभागात अद्यापही एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरुच असून, या संपात चालक-वाहक, कार्यालयीन कर्मचारी, यांत्रिकी कर्मचारी असे एकूण 2 हजार 684 कर्मचारी संपात उतरले होते. त्यामुळे जिल्ह्यातील आठही आगाराची प्रवाशी वाहतूक ठप्प होती. दरम्यान संपात फुट पडल्याने मागील आठवाड्यात कर्मचारी रुजू होण्यास प्रारंभ झाला. त्यामुळे औरंगाबादेतील दोन्ही आगारातून लालपरीची अंशत: वाहतूक सुरु झाली होती. सोमवारपर्यंत 463 कर्मचारी रुजू झाले होते. यामध्ये कार्यालयीन, यांत्रिकीसह चालक -वाहकांचा समावेश आहे.
काल पुन्हा 20 कर्मचारी रुजू झाले. यामध्ये 14 चालक-वाहकांचा समावेश आहे. त्यामुळे पैठण, गंगापूर आणि वैजापूर आगारातून लालपरीची वाहतूक सुरु झाली. पैठण-औरंगाबाद 3, पैठण पाचोड 2, वैजापूर-महालगाव 1, गंगापूर-नेवासा 1, गंगापूर-महालगाव 1 यासह औरंगाबाद-सिल्लोड 4, औरंगाबाद -कन्नड 1, औरंगाबाद -जालना 9 अशा 22 बसेस काल दिवसभरात प्रवाशांना घेवून धावल्या. दरम्यान भाडे तत्त्वावर घेण्यात आलेल्या शिवशाही बसेस पूर्ण मार्गावर धावत असल्याने काही प्रमाणात औरंगाबाद विभागातील प्रवासी वाहतूक पूर्वपदावर येत असल्याचे चित्र आहे. अद्यापही 2 हजार 201 कर्मचारी संपावर ठाम आहे. दरम्यान संपात फुट असल्याने येणाऱ्या दिवसात आणखी चालक-वाहक रुजू होण्याची शक्यता आहे.