पोटनिवडणूक निकाल : काॅंग्रेस पंचायत समितीत, भाजपा झेडपीत सरस तर महाविकास आघाडी दुप्पट स्पीडने

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन | राज्यातल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती पोट निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला. धुळे, नंदुरबार, अकोला, वाशिम आणि नागपूर जिल्हा परिषद आणि त्या अंतर्गत येणाऱ्या पंचायत समित्यांना पोटनिवडणुका, तसेच पालघर जिल्हा परिषद पोटनिवडणुकीच्या सर्वच सर्व जागाचा निकाल जाहीर झाला. मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या निवडणुकीच्या निकालाकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीने यश मिळविले असले तरी काॅंग्रेसने जिल्हा परिषद व पंचायत समितीत मोठी मुसंडी मारलेली आहे.

राज्यातील एकूण बलाबल खालीलप्रमाणे

राज्यातील जिल्हा परिषद गटातील पोटनिवडणूकीतील एकूण 85 जागापैकी भाजपाने 23, काॅंग्रेस व राष्ट्रवादीने प्रत्येकी 17, शिवसेनेने 12 आणि वंचित व अपक्ष यांनी 16 जागा मिळवल्या आहेत. तर पंचायत समितीच्या पोटनिवडणूकीत 144 जागापैकी वंचित व अपक्ष यांनी 38, काॅंग्रेस 35, भाजपा 33, शिवसेना 22 आणि राष्ट्रवादीने 16 जागा मिळवल्या आहेत. यामध्ये महाविकास आघाडीने जिल्हा परिषद गटात 46 तर पंचायत समितीत 73 जागा मिळवून वर्चस्व मिळवल्याचे दिसून येत आहे. मात्र पक्षीय पातळीवर भाजपा जिल्हा परिषदेत तर काॅंग्रेस पंचायत समितीत मोठा पक्ष आहे.

धुळ्यात भाजपाचे एकहाती वर्चस्व

धुळे जिल्हा परिषद गटात 15 जागांपैकी सर्वाधिक 8 जागा भाजपाने जिंकल्या आहेत. तर महाविकास आघाडीने तीन्ही घटक पक्षांच्या मिळून सात जागा होत असल्याने भाजपाने निर्विवाद वर्चस्व मिळविले आहे. येथे काॅंग्रेसने केवळ 2 जागा जिंकल्या. तर पंचायत समितीच्या 30 जागापैकी 15 जागाही भाजपाने मिळवल्या आहेत. त्यामुळे पोटनिवडणुकीत एकहाती वर्चस्व भाजपाचे पहायला मिळाले. अपक्ष 4 जागेवर विजयी झाले आहेत.

नंदूरबारमध्ये महाविकास आघाडीचे वर्चस्व ः राष्ट्रवादीला पंचायत समितीत सर्वात जास्त जागा

नंदूरबार जिल्हा परिषद गटात 11 जागांपैकी सर्वाधिक 4 जागा भाजपाने जिंकल्या आहेत. तर महाविकास आघाडीने तीन्ही घटक पक्षांच्या मिळून 7 जागा होत असल्याने महाविकास आघाडीचे वर्चस्व दिसून येत आहे. येथे काॅंग्रेस व शिवसेनेने प्रत्येकी 3 तर राष्ट्रवादीने केवळ 1 जागा जिंकली. तर पंचायत समितीच्या 14 जागापैकी 6 जागाही राष्ट्रवादीने  मिळवून चारही पक्षात जास्त जागा मिळवल्या आहेत. त्यामुळे पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे वर्चस्व पहायला मिळाले.

अकोल्यात वंचितचे वर्चस्व ः काॅंग्रेस, राष्ट्रवादीला पंचायत समितीत भोपळा

अकोला जिल्हा परिषद गटात 14 जागांपैकी सर्वाधिक 6 जागा वंचित बहुजन आघाडीने जिंकल्या आहेत. तर महाविकास आघाडीने तीन्ही घटक पक्षांच्या मिळून 4 जागा मिळविल्या होत्या तर भाजपला केवळ एकाच जागेवर विजयी झाले. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीचे वर्चस्व दिसून आले. येथे काॅंग्रेस, शिवसेना, प्रहार व भाजपने प्रत्येकी 1 तर राष्ट्रवादीने 2 जागा जिंकल्या. इतर 2 जागांवर अपक्षांनी बाजी मारली. तर पंचायत समितीच्या 28 जागापैकी 14 जागा वंचितसह अपक्षांनी जिंकल्या आहेत. शिवसेना 5, भाजपाला 4 जागा मिळाल्या आहेत. तर राष्ट्रवादीने व काॅंग्रेस यांना खातेही उघडता आले नाही. त्यामुळे अकोला जिल्हा परिषद गटात तसेच पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे वर्चस्व पहायला मिळाले.

वाशिमला राष्ट्रवादी पुन्हा

वाशिम जिल्हा परिषद गटात 14 जागांपैकी सर्वाधिक 5 जागा राष्ट्रवादीने जिंकल्या आहेत. तर महाविकास आघाडीने तीन्ही घटक पक्षांच्या मिळून 8 जागा होत असल्याने महाविकास आघाडीचे वर्चस्व दिसून येत आहे. येथे भाजपाला केवळ 2 जागांवर समाधान मानावे लागले. काॅंग्रेस 2 व शिवसेनेने 1 जागा मिळवली. अपक्ष 4 जागांवर विजयी झाले. तर पंचायत समितीच्या 27 जागापैकी अपक्षांनी 9 तर 8 जागा राष्ट्रवादीने मिळवल्याने राष्ट्रवादीचे वर्चस्व दिसले. भाजपाला जिल्हा परिषदेप्रमाणे पंचायत समितीतही दोनच जागा मिळाल्या. महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी 16 जागा मिळवल्याने वर्चस्व दिसून येत आहे.

पालघरमध्ये शिवसेनेचा बोलबाला तर अपक्ष दुसऱ्या स्थानी

पालघर जिल्हा परिषद गटात 15 जागांपैकी भाजप व शिवसेनेने प्रत्येकी 5 जागा जिंकल्या. तर महाविकास आघाडीने तीन्ही घटक पक्षांच्या मिळून 9 जागा होत असल्याने महाविकास आघाडीचे वर्चस्व दिसून येत आहे. मात्र यामध्ये काॅंग्रेसला शून्य जागा मिळाली आहे. राष्ट्रवादी 4 व अपक्ष 1 जागांवर विजयी झाले. तर पंचायत समितीच्या 14 जागापैकी 5 जागा जिंकून शिवसेना मोठा पक्ष असल्याचे दिसून आले. महाविकास आघाडीला 7 जागा मिळाल्या. यामध्ये राष्ट्रवादीला 2 तर काॅंग्रेसला जिल्हा परिषदेप्रमाणे पंचायत समितीतही भोपळाच मिळाला. तर अपक्षांनी 4 आणि भाजपाने 3 जागा मिळवल्या आहेत.

नागपूरात काॅंग्रेसचा बोलबाला

नागपूरमध्ये जिल्हा परिषद गटात 16 जागांपैकी 9 जागांवर काॅंग्रेसने जिंकल्या असल्याने एकहाती वर्चस्व दिसून आले. तर महाविकास आघाडीने तीन्ही घटक पक्षांच्या मिळून 11 जागा होत आहेत. मात्र यामध्ये शिवसनेला शून्य जागा मिळाली आहे. राष्ट्रवादी 2, भाजप 3 व अपक्ष 2 जागांवर विजयी झाले. तर पंचायत समितीच्या 31 जागापैकी 21 जागा जिंकून काॅंग्रेस मोठा पक्ष असल्याचे दिसून आले. महाविकास आघाडीला 23 जागा मिळाल्या. यामध्ये राष्ट्रवादीला 2 तर शिवसेनेला जिल्हा परिषदेप्रमाणे पंचायत समितीतही भोपळाच मिळाला. तर अपक्षांनी 2 आणि भाजपाने 6 जागा मिळवल्या आहेत.

 

Leave a Comment