हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : भाजपमधील बरेच नेते हा त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी ओळखले जातात. तर्कहीन विधाने करण्यासाठी भाजपमधील नेते प्रसिद्ध आहेत. अशा प्रसिद्ध नेत्यांपैकी एक नेते म्हणजे कैलाश विजयवर्गीय. पोहे खाण्याच्या पद्धतीवरून मी बांगलादेशी मजुराला ओळखले होते, असा अजब दावा कैलाश विजयवर्गीय यांनी केला आहे. घुसखोरांना कसं ओळखायचं याच्या टीप्स सीएए समर्थक जाहीर कार्यक्रमांमध्ये देऊ लागले आहेत.
इंदूर प्रेस क्लबनं आयोजित केलेल्या ‘लोकशाही, राज्यघटना आणि नागरिकत्व’ या विषयावरील चर्चेत भाग घेताना ते बोलत होते. ‘माझ्या घरातली एक खोली मी हल्लीच दुरुस्त करून घेतली. त्या कामावर असलेले मजूर एकदा पोहे खात होते. त्यांची खाण्याची पद्धत मला थोडी विचित्र वाटली. ते मजूर बांगलादेशी आहेत का, याची चौकशी मी कंत्राटदाराकडं केली. त्या मजुरांनाही हाच प्रश्न विचारला. त्यानंतर ते कामावर आलेच नाहीत,’ असं विजयवर्गीय म्हणाले. ‘या प्रकरणी मी अद्याप पोलिसांकडं तक्रार केलेली नाही. लोकांना जागरूक करण्यासाठी मी हा किस्सा सांगतोय. कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. नागरिकत्व कायदा देशाच्या भल्यासाठीच आहे. या कायद्यामुळं खऱ्या शरणार्थींना नागरिकत्व मिळणार असून घुसखोरांची ओळख पटणार आहे. हे घुसखोर देशाच्या अंतर्गत सुरक्षेसाठी धोकादायक आहेत,’ असं ते म्हणाले.