आयुष्यात प्रत्येकाला एक प्रामाणिक साथ हवी असते. ‘व्हॅलेंटाइन डे ‘ ही जरी आपली संस्कृती नसेल तरीही आपल्याला या दिवशी आपला हक्काचा ‘व्हॅलेंटाइन’ भेटावा असं वाटतं! अनोळखी पासून ओळखीची सुरुवात होताना सारं कसं सुंदर वाटतं! प्रेमात पडताना सतत तीच व्यक्ती हवीशी वाटते. बोलू वाटतं, रुसू वाटतं, त्याने/ तिने रुसवा- फुगवा दूर करावा असं वाटू लागतं. प्रेम कितपत पुढे जाईल याची खात्री नसते तरी पण प्रेम करावसं वाटतं. प्रत्येक वयाचा एक टप्पा असतो अन् त्या टप्प्यानुसार आपल्याला प्रेमाच्या वेगळ्या संकल्पना पहायला मिळतात. वय वीस ते तीस पर्यंत सगळ्या आयुष्याला कलाटणी मिळून जाते. यात घेतलेले निर्णय आयुष्याला नवी दिशा देऊन जातात तर कधी दिशाहीन करून टाकतात.
काहीवेळा जाणीव फक्त त्याच्या सोबतीची असते.आपल्या आवडत्या व्यक्तीला पाहणंच बऱ्याचदा आपल्यासाठी पुष्कळ असतं. कॅफे म्हणताना ‘कॉफी’ तर फक्त निमित्त असावं कारण भूक वगैरे नसते.थकलेल्या जीवाला पुरेसा विसावा हवा असतो. व्यक्ती हा सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने त्रस्त होत असतो. या धावत्या जगात प्रत्येकजण त्रस्त आहे. स्पर्धा अन् एकमेकांपेक्षा वरचढ दाखविण्याच्या नादात आपण बऱ्याचदा स्वार्थी होऊन खऱ्या आनंदाला बाजूला करत आहोत. अशा वेळी एखाद्या व्यक्तीचा प्रेममय सहवास गरजेचा असतो.
कामाचा थकवा कितीही असला तरी तो थकवा आपण त्याच जागी ठेवून जोशाने सुरूवात करावी अन् प्रत्येक क्षणाचा आनंद घ्यायला हवा असं वाटतं. कामावरून सुटल्यावर नेहमीच्याच रस्त्यावर घेऊन जाणाऱ्या गाडीने अचानक बदललेला रस्ता मग आपल्याला आवडतो.अचानक बदललेली दिशा नकळत चेहऱ्यावर हास्य फुलवत येते. साथीवरचा विश्वास हा दृढ आहे त्यामुळे कोणत्याही रस्त्यावर नेलं तरी मला ते आवडेल अशी भावना असते.प्रेम करत असताना कसं ना सारं काही सुंदर वाटत असतं! आयुष्यात प्रेम करून पहावे असं म्हणताना ते निरपेक्ष अन् निर्मळ असायला हवं! क्षणच असतात ते ज्यांच्यामुळे आपण नकळत हसू लागतो, बागडू लागतो, स्वतःशी बोलू लागतो तर कधी गुणगुणू लागतो.
पुढे जाऊन काय होईल हा प्रात्यक्षिक विचार त्यावेळी कोणाला येत नाही. प्रेम केल्यावर वैचारिकपणे विचार करणं ही झाली एक बाजू अन् त्यावेळी त्या भावना अनुभवणे ही झाली दुसरी बाजू. अल्लड वयात एक वेगळेच जीवन आपण जगत असतो. या जीवनात कोणाशी तरी बोलावे म्हणजे आजच्या भाषेत डेटिंग, चॅटिंग, मेसेजिंग असं! प्रेमात ठामपणा असतो पण तो काही विशिष्ट मर्यादेर्यंत आपल्याला समजून येतो. हक्काची व्यक्तीच आपल्याला भेटली नाही तर त्याच्यासाठी काहीतरी करण्याची, आपले छंद जोपासण्याची मजाच निघून जाते. असे कित्येक हातात हात घेऊन बसणारे आहेत पण ते हात सोबत राहतील याची काही शाश्वती नाही. समाजात असे बरेचसे लोकं आहेत.ज्या तीव्रतेने सुरुवात होते ती तीव्रता सतत कशी राहील? पहिल्या पावसाची मजा, गंध पावसाळा सुरू झाल्यावर तितकासा मोहक वाटेल का? नको त्या अपेक्षा करत मग प्रेमाचं रूपांतर स्वार्थात होतं! प्रेम मुक्त असावं बंदिस्त नाही.
अनोळखी व्यक्ती आपला होत जाताना नात्यात एक वेगळे प्रकारचे वलय तयार होते.. आपण कितीही रागावलो असलो तरी साथीचं आपल्याला शांतपणे समजून घेणं हे मनाला नेहमी भावते! कधीकधी खूप बोलायचं असतं पण त्या व्यक्ती समोर आल्यावर आपण शांत होऊन जातो. एक कॅफे पाहून विचार आला की ‘मी’ अँड ‘यु’असं नाव त्याला दिलं असावं कारण त्यात दोन व्यक्तींना ‘तू’ अन् ‘ मी ‘ पासून ‘आम्ही’ पर्यंतच्या प्रवासासाठी एकमेकांना समजून घेता येईल असं काहीतरी असावं. काही ठिकाणांची नावेच अशी असतात की ज्यामुळे आपण त्याकडे आकर्षित होऊ लागतो.अर्धवट प्रेमात आपण जगणं हरवून बसतो पण आपले छंद असतात जे आपल्याला यावेळी साथ देतात. अलिकडे लिखाण पूर्ण होत नाही. हा लेख खूप दिवसांनी लिहित असताना, शब्दांची गुंफण काही होत नाहीय तरीही लिहिणं हे चालू ठेवावं वाटतं…. आपल्या लेखणीला प्रपोज करावा अन् पुन्हा एकदा या जगण्यावर प्रेम करायला सुरुवात करावं असं वाटत आहे.
तुमचा व्हॅलेंटाईन अन् जगण्याची नवी उमेद असणारे प्रसंग नक्की कळवा. तुमच्या प्रतिक्रियांची प्रतिक्षा असेल.
— तुमची सखी,
मयुरी खानविलकर, सातारा
८३८१०९११७४
[email protected]




