पेठ येथे बिबटयाच्या हल्ल्यात कालवड ठार तर 2 गायी गंभीर, पेठ परिसरात घबराटीचे वातावरण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली प्रतिनिधी । वाळवा तालुक्यातल्या पेठ येथील चव्हाण मळा परिसरातील गोठयात असणार्‍या बांधीव जनावरांवर बिबट्याने केलेल्या हल्ल्यात एक कालवड जागीच ठार झाली आहे तर 2 गायी गंभीर जखमी झाल्याने पेठ परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. धोंडीराम महादेव कदम यांच्या चव्हाण मळा याठिकाणी शेती असून त्या ठिकाणी जनावरांचा गोठा आहे.

मंगळवारी पहाटेच्या सुमारास गोठयात बांधलेल्या जनावरांवर बिबट्याने हल्ला केला. बिबटयाच्या हल्ल्यात कालवड जागीच ठार झाली. 2 गायी जखमी झाल्याने अंदाजे 40 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. कदम गल्लीपासून वारके मळा, चव्हाण मळा असा शेकडो एकर ऊसाचा पट्टा असून बर्‍याच जणांच्या वस्त्या मळयामध्ये आहेत. जनावरांचे गोठे आहेत. बिबट्याचे वास्तव्य असल्याने या ठिकाणी असणार्‍या नागरिकांच्यात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मध्यंतरी पेठ येथील माळरान भागात बिबट्याने धुमाकूळ घातला होता. त्यानंतर भरवस्तीत माणकेश्वर गल्लीत बिबट्या अनेकांच्या नजरेस पडला होता. वारंवार तक्रारी देऊन सुद्धा वनविभाग याकडे दुर्लक्ष करीत आहे. दिड वर्ष झाले वनविभागातील अधिकार्‍यांना सांगून सुध्दा कोणतीही कारवाई केली नाही. आता काय बिबट्याने शेतकर्‍यांचा जीव घेतल्यावरच वनविभाग लक्ष देणार आहे का? असा संतप्त सवाल पेठचे ग्रामपंचायत सदस्य नामदेव कदम यांनी केला.

Leave a Comment