मुख्यमंञ्याच्या एका स्वाक्षरीसाठी ३७७ राज्यसेवा परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांचे भवितव्य ‘पुन्हा’ एकदा टांगणीला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे प्रतिनिधी । महाराष्ट्र लोकसेवा आयोगानेराज्यसेवा -२०१७ परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांची न्यायिक पद्धतीने निवड यादी जाहीर करुन देखील उमदेवारांना आता मुख्यमंत्री यांच्या स्वाक्षरी शिवाय पुढील प्रशिक्षण व नियुक्ती कार्यक्रमाची वाट पहावी लागणार आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या राज्यसेवा परीक्षा २०१७ च्या यशस्वी उमेदवारांनी त्यांच्या दीड वर्षापासून रखडलेल्या प्रशिक्षण व नियुक्तीसाठी पुणे विभागीय आयुक्त कार्यालय येथे ६ सप्टेंबर रोजी तीव्र आंदोलन केले होते.

शासनाने सदर आंदोलनाची त्वरित दखल घेत न्यायालयाच्या निर्णयानुसार पुन्हा निवड यादी जाहीर केली. या निवड यादी नुसार उमेदवारांना शिफारसपञ ११ सप्टेंबर रोजी प्राप्त झाले व १३ सप्टेंबर रोजी पुढील नियुक्तीचे आदेश देतो, असे आश्वासन अपर मुख्य सचिव सिताराम कुंटे यांनी दिले होते. मात्र, सर्व न्यायिक प्रक्रिया पार पडून देखील सदर यादी अचानकपणे मुख्यमंत्री यांचे आदेशास्तव सादर करण्यात आल्याचे समजल्याने उमेदवारांच्या भावना आता अनावर झालेल्या आहेत.

सदर परिक्षेमधुन उपजिल्हाधिकारी, पोलीस उपधिक्षक, तहसिलदार, सहायक विक्रीकर आयुक्त, मुख्याधिकारी नगरपरिषदअशा शासनातील महत्वाच्या वर्ग अ व वर्ग ब पदाकरीता एकूण ३७७ उमेदवारांची निवड करण्यात आली. राज्यसेवा परिक्षेची काठिण्य पातळी लक्षात घेता अनेक उमेदवार आपल्या आयुष्यातील महत्वाची वर्षे यासाठी देत असतात. लाखों परिक्षार्थी यांच्यामधून प्रचंड स्पर्धेचा सामना करत ही उमेदवार यशस्वी होतात तर अनेक उमेदवार अत्यंत प्रतिकूल परिस्थितीचा सामना करत ह्या परीक्षांमध्ये मात मिळवितात.

नव्याने निकाल लागूनही नियुक्ती मिळत नसल्याचे शल्य व उद्वेग उमेदवारांच्या मनात आहे. आचार संहिता लागणेपूर्वी नियुक्ती न मिळाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा उमेदवारांनी दिलेला आहे. तरी मुख्यमंत्री यांनी याबाबत तात्काळ विचार करावा किंव्हा ‘महाजनादेश’ याञेतून असेल तेथूनच फोनद्वारे सामान्य प्रशासनास आदेश द्यावेत अशी विनंती उमेदवारांनी केली आहे.

“सदर यादी मुख्यमंत्री यांचे आदेशासाठी पाठवण्याचे नेमके प्रयोजन अनाकलनीय असून पदोन्नत होत असलेल्या प्रस्थापित अधिकाऱ्यांना सेवाजेष्ठतेत फायदा मिळावा यासाठी तर उशीर केला जात नाही ना ?…अशी शंका आता आम्हा सर्वांना वाटत आहे. आचारसंहिता लागण्यापूर्वी आमचा मार्ग मोकळा करा अन्यथा पुन्हा आंदोलन हे तीव्र स्वरुपात करू.” असे वर्ग-१ पदी निवड झालेल्या उमेदवारांने यावेळी बोलतांना सांगितले.