कारला पाठीमागून डंपरची धडक; एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

कारला मागून डम्परने धडक दिल्याने मलकापूर-कऱ्हाड येथील एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला. पेठ ते सांगली रस्त्यावर आष्टानजीकच्या गाताडवाडी येथे शनिवारी (ता.२६) सकाळी नऊ वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. सदर कुटुंबीय सांगलवाडी येथे घरगुती कार्यक्रमाला जात असताना हा दुर्दैवी अपघात घडला.

प्राप्त माहितीनुसार, मलकापूरचे व्यावसायिक अधिकाराव पोळ (४९), त्यांची आई गीताबाई (७०) पत्नी सुषमा (४२), भावजय सरिता सुभाष पोळ (३५) सर्व रा. पोळ वस्ती मलकापूर-कऱ्हाड) अशी अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत. अपघातात पुतणी थोडक्यात वाचली. मलकापूर येथील पोळ कुटुंबीय शनिवारी सकाळी सांगलवाडी येथे घरगुती कार्यक्रमाला जाण्यासाठी निघाले.

अपघाता दरम्यान, कारमध्ये पाच जण बसले होते. जातडवाडी येथे समोरील वाहनाने ब्रेक मारल्याने पोळ यांनीही कारचा ब्रेक दाबला. यावेळी मागून येणाऱ्या वाहनाने त्यांच्या कारला जोरात धडक दिली. त्यामुळे त्यांची कार मधोमध फसली. यातच चौघांचा मृत्यू झाला. घटनास्थळी पोलिस अपघाताची माहिती घेत आहेत. त्यानंतरच सविस्तर माहिती मिळू शकते असे पोलिसांनी सांगितले.