Saturday, June 3, 2023

कारच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार ; कारही उलटली

कराड :- मद्यधुंद चालकाचा ताबा सुटून कारची दुचाकीला धडक बसली. या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला. गुहाघर-विजापूर राष्ट्रीय महामार्गावर सुपने, ता. कराड गावच्या हद्दीत शनिवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.

दरम्यान, अपघातानंतर कार महामार्गाकडेला नाल्यात जाऊन पलटी झाली. त्यामध्ये कारचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तर दुचाकीचाही चक्काचूर झाला आहे. कारचा चालक मद्यधुंद स्थितीत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर जमावाने त्याला चोप दिला. तसेच पोलिसांच्या स्वाधीन केले.

संजय सुभाष गुरव (वय 44, रा. सुपने) असे अपघातात ठार झालेल्याचे नाव आहे. तर याप्रकरणी अजय शामराव हजारे (रा. साई प्लाझा, मेनरोड, पाटण) याच्यावर कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सुपने येथील संजय गुरव हे शनिवारी दुपारी दुचाकीवरून (क्र. एम. एच. 50 बी 8859) कराडहून सुपने गावच्या दिशेने निघाले होते. ते गावानजीक पोहोचले असताना समोरून आलेल्या कारने (क्र. एम. एच. 50 एल 5433) त्यांच्या दुचाकीला धडक दिली. ही धडक एवढी भिषण होती की, संजय गुरव हे दुचाकीसह काही अंतरावर फरपटत जाऊन लोखंडी रेलिंगजवळ पडले. तर कार रस्त्याच्या दुसर्‍या बाजूला जाऊन उलटली.

अपघात निदर्शनास येताच परिसरातील ग्रामस्थांनी त्याठिकाणी धाव घेतली. त्यांनी संजय गुरव यांना उपचारार्थ कराडच्या उपजिल्हा रुग्णालयात हलविले. मात्र, उपचारापुर्वीच त्यांचा मृत्यू झाला. अपघाताबाबतची फिर्याद चेतन विजय पाटील (रा. सुपने) यांनी कराड ग्रामीण पोलिसात दिली आहे. हवालदार राजे तपास करीत आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’