पिंपरी प्रतिनिधी । सर्व्हिसिंगसाठी आलेली आलिशान कार बावधन येथून चोरण्यात आली होती . या गुन्ह्यातील आरोपीस नुकतीच गोव्यातून अटक करण्यात आली आहे. हिंजवडी पोलिसांनी ही कामगिरी केली. वसिम कासिम सय्यद (वय ३२, रा. गुगल हौसिंग सोसायटी, मडगाव, गोवा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. विकास परदेशी यांनी याबाबत हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत गवारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, २१ नोव्हेंबर २०१९ रोजी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास फिर्यादी परदेशी हे काम करीत असलेल्या कोठारी टोयोटा सर्व्हिस सेंटरमध्ये सर्व्हिसिंगसाठी आलेली फाँचुनर कार एमएच-४४-के-७७०७ ही मालकाला देण्यासाठी चालले होते. त्यावेळी एका व्यक्तीने ती मोटार रस्त्यात अडविली. “ये हमारे कंपनी की गाडी है, मैं लेने आया है. आप ड्राप करने जा रहे है क्या?” असे म्हणून “कोई बात नही, मैं गाडी लेने आया हूँ ” असे म्हणून फिर्यादी परदेशी यांना सर्व्हिसिंगचे सात हजार रूपये देऊन विश्वास संपादन केला. त्यांच्या ताब्यातील सर्व्हिसिंगसाठी आलेली कार फसवणूक करून चोरून नेली. हिंजवडी पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
हिंजवडी पोलिसांनी सीसीटिव्ही फुटेज व तांत्रिक माहितीच्या आधारे कार चोरणारा चोरटा हा गोवा येथे असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांचे एक पथक गोव्याकडे रवाना झाले. सलग तीन दिवस पाळत ठेवुन फाँचुनर कारसह चोरट्यास ताब्यात घेतले. तो चोरटा गोवा येथील रहिवासी असुन त्याच्यावर गोवा राज्यात तीन, कर्नाटक राज्यात १ असे एकुण ४ आलिशान कार चोरीचे गुन्हे नोंद आहेत.
हि कामगिरी पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, सह आयुक्त प्रकाश मुत्याल, अतिरिक्त आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त विनायक ढाकणे, सहाय्यक आयुक्त श्रीकांत मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक, यशवंत गवारी, निरीक्षक (गुन्हे) अजय जोगदंड, उपनिरीक्षक अनुरुद्ध गिजे, एम. डी. वरुडे, कर्मचारी वायबसे, बाळू शिंदे, किरण पवार, नितीन पराळे, आतिक शेख, कुणाल शिंदे, विवेक गायकवाड, सुभाष गुरव, अमर राणे, झनकसिंग गमलाड, श्रीकांत चव्हाण, चंद्रकांत गडदे, विकी कदम, अली शेख, रितेश कोळी, आकाश पांढरे यांच्या पथकाने केली.