पिंपरी चिंचवड : हॅलो महाराष्ट्र – पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश हे आपल्या धडाकेबाज कारवाईसाठी ओळखले जातात. गुन्हेगारांच्या मनात पोलिसांविषयी जरब बसवण्यात कृष्णप्रकाश यांनी महत्वाची भूमिका पार पाडली आहे. परंतु पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांच्या टीमला मुंबईतल्या एका सुताराने 24 हजार रुपयांना गंडा घातला आहे.
काय आहे नेमके प्रकरण
8 डिसेंबरला पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या कंट्रोल रुममध्ये एका व्यक्तीने फोन करुन मी अहमदाबाचा पोलीस आयुक्त विजय सिंग बोलत असल्याचे सांगितले. पिंपरी-चिंचवडमध्ये होणाऱ्या गुन्ह्यांविषयी माझ्याकडे माहिती आहे, ती माहिती मला तुमच्या आयुक्तांना द्यायची आहे असे सांगून या व्यक्तीने कंट्रोल रुममधील कर्मचाऱ्यांकडून कृष्णप्रकाश यांचा नंबर मिळवला. यावेळी कंट्रोल रूममधील कर्मचाऱ्यांनी या व्यक्तीवर विश्वास ठेवत कृष्णप्रकाश यांचा नंबर त्या व्यक्तीला दिला. यानंतर या व्यक्तीने कृष्णप्रकाश यांना फोन करण्याचा प्रयत्न केला, परंतू कृष्णप्रकाश यांनी फोन न उचलला नाही. यानंतर या व्यक्तीने पुन्हा एकदा कंट्रोल रुमला फोन लावून तुमचे आयुक्त फोन उचलत नाहीत असं सांगत तुमच्या इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांचे नंबर द्या असं सांगत या व्यक्तीने अन्य वरिष्ठांचे नंबर मिळवले.
पिंपरी-चिंचवडमध्ये गुन्हे घडणार असल्याची बतावणी
या व्यक्तीने बड्या पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क साधत, तुमच्या शहरात घडणाऱ्या गुन्ह्यांविषयी माहिती माझ्याकडे आहे. ही माहिती देणाऱ्या खबऱ्याला तुम्हाला त्यासाठी आर्थिक मदत करावी लागेल असे सांगून या व्यक्तीने पोलीस अधिकाऱ्यांना गूगल पे चा अकाऊंटचा नंबर दिला. यावेळी पोलिसांना त्या व्यक्तीवर विश्वास बसला. यानंतर पोलिसांनी या व्यक्तीने दिलेल्या अकाऊंटवर 24 हजार रुपये पाठवले. त्यानंतर या व्यक्तीने पैसे ट्रान्स्फर झाल्यानंतर आपला फोन स्विच ऑफ केला. वारंवार संपर्क साधल्यानंतरही फोन बंद लागत असल्यामुळे पोलिसांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने कारवाई करत मोबाईल टॉवर लोकेशन आणि तांत्रिक सहाय्याने या व्यक्तीला अटक केली.
आरोपी मुंबईच्या जोगेश्वरी भागात सुताराचं काम करतो
मुंबई पोलिसांनी या व्यक्तीची अधिक चौकशी केली असता हा व्यक्ती मुंबईच्या जोगेश्वरी भागात सुताराचं काम करत असल्याचे समोर आले. या आरोपीचे नाव खलीलउल्ला खान असे असून त्याला पिंपरी-चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे. या आरोपीला अलिशान जीवन जगण्याची आणि लेडीज बारमध्ये पैसे उडवण्याची सवय आहे. यासाठीच त्याने हे सगळे केले आहे. या व्यक्तीने घातलेल्या गंड्याची सध्या संपूर्ण जिल्ह्यात चर्चा सुरु आहे.