औरंगाबाद – आमदार गावाबाहेर काढण्याची भाषा करतोय, पोलिसही माझी तक्रार घेत नाही, माझी जमीन नावावर करून घेत, मला भिकेला लावले.” असा आरोप करत एक महिला हातात दांडा घेऊन मंगळवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या दालनासमोर समोर उभी ठाकून न्याय मागत होती. या अचानक घडलेल्या प्रसंगामुळे काही काळ जिल्हाधिकारी कार्यालयात एकच खळबळ उडाली होती.
याविषयी अधिक असे की मंगळवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयात एक मळके कपडे घातलेली आणि डोक्याला पट्टी बांधलेली एक महिला आली. ती थेट जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या दालना समोरच जाऊन उभी राहिली. तिने दालनासमोर उपस्थित असलेल्या नागरिकांना, त्यांना बाहेर बोलवा, मला भेट घ्यायची आहे, असे म्हणत जिल्हाधिकरी यांना भेटण्याची विनंती केली. यावेळी त्या महिलेने जिल्हाधिकारी यांच्या दालनासमोर बसून, ‘मी आजारी आहे, मरणाला टेकली तरी मला न्याय मिळत नाही. मी पाचोड वरून चालत आले मला जिल्हाधिकारी यांना भेटायचे आहे, जिल्हाधिकारी आले नाही तर मी जिव देईन अशी ती महिला म्हणत होती.
यावेळी तिला अनेकांनी समजवण्याचा प्रयत्न केला, मात्र ती ऐकत नसल्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या सुरक्षारक्षकाने महिलेला समजूत देऊन माघारी पाठवले. ती महिला भोळसर व आजारी असल्याचे उपस्थितांचे म्हणणे आहे. मात्र महिलेने ऐनवेळी उपस्थित केलेल्या प्रसंगामुळे सुरक्षारक्षकांसह अधिकारी-कर्मचाऱ्यांची चांगलीच धांदल उडाली असल्याचे पहायला मिळाले.