Cash Limit At Home | आजकाल भ्रष्टाचार, काळा पैसा या गोष्टी प्रामुख्याने वाढत आहेत. काळा पैसा बंद करण्यासाठी आता जवळपास सगळेच व्यवहार ऑनलाइन झालेले आहेत. त्यामुळे आता लोकांकडे प्रत्येक पैशाचा हिशोब असतो. परंतु आता या व्यवहारांवर देखील सरकारने अनेक नियम आणलेले आहेत. बरेच लोक त्यांचा पैसा बँकेत न ठेवता त्यांच्या घरी ठेवतात. परंतु घरात देखील रोख रक्कम ठेवण्यात काही मर्यादा आहेत का? त्याचप्रमाणे आपल्या घरात किती पैसे असायला हवेत? याबद्दल अजूनही अनेकांना माहित नाही. तर आज आपण आपल्या घरामध्ये कायद्याने किती रोख रक्कम ठेवू शकतो, त्याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.
जर तुम्ही तुमचे पैसे तुमच्या घरात ठेवणार असाल तर हे दोन गोष्टींवर अवलंबून असते. ते म्हणजे तुमची आर्थिक क्षमता आणि व्यवहाराच्या सवयी. जर तुमचा उत्पन्नाचा ठोस असा मार्ग असेल आणि तेवढे पैसे जर तुमच्याकडे येत असेल, तर तुम्ही ते पैसे घरात ठेवू शकता. त्याचप्रमाणे तुमच्या व्यवहाराच्या सवयी देखील यावर खूप अवलंबून असतात. तुमच्या घरात तुम्ही कितीही रोख रक्कम घेऊ शकता. याबाबत अजूनही सरकारने कोणताही कायदा काढलेला नाही. परंतु याबाबत एकच नियम आहे की, तुमच्याकडे घरात असणाऱ्या प्रत्येक रोख रकमेचा तुमच्याकडे हिशोब असला पाहिजे.
जर तुमच्याकडे असणाऱ्या प्रत्येक रुपयाचा तुमच्याकडे हिशोब असेल, तर तुम्ही हवी तेवढी रक्कम तुमच्या घरात ठेवू शकता. ही रक्कम जरी घरात असेल तरी तुमच्या उत्पन्नाचा स्त्रोत काय आहे? त्याचप्रमाणे तुम्ही कर भरला आहे की नाही? हे देखील महत्त्वाचे आहे. जर तुम्ही आयकर तपासामध्ये सापडला तर तुमच्या घरात असणाऱ्या प्रत्येक रुपयाचा तुम्हाला हिशोब द्यावा लागेल. आणि जर तो हिशोब तुमच्याकडे नसेल, तर तुमच्याकडे मोठ्या प्रमाणात कारवाई होऊ शकते.
2017 मध्ये आपल्या देशात नोटबंदी झाली त्यानंतर इन्कम टॅक्सने सांगितले होते की, तुमच्या घरात अघोषित रक्कम आढळली तर एकूण वसूल केलेल्या रकमेच्या 137% पर्यंत कर तुम्हाला लागू केला जाऊ शकतो.
आपण बँकेतून देखील जर कॅश काढायची असेल, तर त्यासाठी देखील मर्यादा आहे. ती म्हणजे सेंट्रल बँक ऑफ डायरेक्ट टॅक्सच्या नियमानुसार तुम्हाला जर एका वेळी 50,000 पेक्षा जास्त रोख रक्कम काढायची असेल किंवा बँकेमध्ये ठेवायची असेल, तर त्यासाठी तुम्हाला तुमचे पॅन कार्ड दाखवावे लागते. जर एखाद्या व्यक्तीने एका वर्षात २० लाखांपेक्षा जास्त रोख रक्कम जमा केली. तर त्याला पॅन कार्ड किंवा आधार कार्ड दाखवावे लागते. परंतु जर त्या व्यक्तीने तसे केले नाही, तर त्याला 20 लाख रुपयांपर्यंतचा दंड होऊ शकतो. त्याचप्रमाणे तुम्ही वर्षात बँकेतून 1कोटी रुपयांपेक्षा अधिक रोख रक्कम काढल्यास तुम्हाला 2 टक्के टीडीएस देखील भरावा लागतो.
तुम्ही जर एका वर्षात 20 लाखांपेक्षा जास्त व्यवहार केले. तर त्यासाठी तुम्हाला दंड आकारला जाऊ शकतो. तुम्हाला कोणतीही गोष्ट खरेदी करायची असेल, तर तुम्ही 2 लाख रुपयांपेक्षा जास्त रोख रक्कम देऊ शकत नाही. जर तुम्हाला तसे करायचे असल्यास तुम्ही पॅन कार्ड किंवा आधार कार्ड द्यावे लागेल. कारण डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्डद्वारे एका वेळी 1 लाख रुपयांपेक्षा जास्त व्यवहार छाननीच्या अधीन नसू शकतात. त्यामुळे आता घरात कॅश ठेवताना किंवा कॅश व्यवहार करताना तुम्हाला खूप जास्त खबरदारी घ्यावी लागणार आहे.