हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| सध्या महाराष्ट्र आणि इतर राज्यांमध्ये देखील महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढत चालल्या आहेत. मात्र तरीदेखील सरकारकडून कोणतेही ठोस पाऊल उचलण्यात आलेले नाही. या पार्श्वभूमीवर राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे (Haribhau Bagade) यांनी एक मोठे विधान केले आहे. त्यांनी, “महिलांना छेडणाऱ्यांना बदडून काढा आणि बलात्कार करणाऱ्यांना नपुंसक करा. तेव्हा कुठे असे गुन्हे कमी होतील” असे त्यांनी म्हटले आहे. त्यांच्या याच वक्तव्याचे राज्यभरात चर्चा सुरू झाली आहे.
सोमवारी भरतपूर जिल्हा बार असोसिएशनच्या शपथ ग्रहण समारंभात हरिभाऊ बागडे उपस्थित राहिले होते. यावेळी बोलताना, “आमच्याकडे (महाराष्ट्रात) जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्य होते, तेव्हा गावच्या एका पाटलाने बलात्कार केला. यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याचे हात-पाय तोडण्याचे आदेश दिले होते.” असे त्यांनी म्हणले.
त्याचबरोबर, “लोक महिलांवरील अत्याचाराचे व्हिडिओ तयार करतात. हे बरे नाही. एखाद्या महिलेसोबत छेडछाड झाली, तर त्या माणसाला पकडा, आपल्यासोबत आणखी दोन-चार लोक येतील. जोवर, आपण घटनास्थळी जाऊन छेडछाड, बलात्कार करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना रोखावे आणि बदडून काढावे, अशी आपली मानसिकता होणार नाही, तोवर हे गुन्हे थांबणार नाहीत.” असेही त्यांनी सांगितले.
इतकेच नव्हे तर, “गुन्हेगारांना कायद्याची भीती वाटते की नाही, हे माहित नाही. मात्र, जर १२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलाचा-मुलीचा कुणी विनयभंग केला, बलात्कार केला तर त्याला फाशीची शिक्षा आहे. तरीही असे गुन्हे थांबत नाहीत. असे प्रकार दररोज ऐकायला मिळतात. यावरून, गुन्हेगारांना कायद्याची भीती राहिलेली नाही, असे दिसते. कायद्याची भीती वाटावी, यासाठी काय करायला हवे, आपण विचार करू शकता? कायदे अस्तित्वात असूनही अशा घटना का घडत आहेत, याबद्दल आपण सूचना देऊ शकता? यावर विचार व्हायला हवा,” असे वक्तव्य या कार्यक्रमांमध्ये हरिभाऊ बागडे यांनी केले आहे.
दरम्यान, राज्यामध्ये दिवसेंदिवस महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत चालली आहे. त्यामुळे राज्यात महिला सुरक्षित आहेत का नाहीत याबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या मुद्द्याला धरूनच विरोधक सरकारवर जोरदार टीका करत आहेत. तर दुसऱ्या बाजूला बलात्कार करणाऱ्यांविरोधात कठोर कायदा करण्यात यावा, अशी मागणी केली जात आहे.