Friday, June 9, 2023

तलवारीने केक कापणे पडले महागात, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर दोघांना अटक

उल्हासनगर : हॅलो महाराष्ट्र – आजकाल लोक आपला वाढदिवस साजरा करण्यासाठी काय काय करतील याचा काही नेम नाही. उल्हासनगरमधील कॅम्प नं-१ शास्त्रीनगर परिसरात भर रस्त्यावर तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा करणे दोघांना चांगलेच महागात पडले आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर, एकच खळबळ उडाली होती. या व्हिडिओच्या माध्यमातून पोलिसांनी दोघांना अटक केली असून बाकी लोकांचा शोध सुरु आहे.

शहरातील मुख्य रस्त्यावर तलवारीने केक कापल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रकारामुळे सर्वस्तरातून पोलिसांच्या कार्यक्षमतेवर टीका करण्यात येत आहे. अश्या हुल्लडबाज व गुन्हेगारीवृत्तीच्या तरुणावर कारवाई करण्याची मागणी सगळीकडून करण्यात येत आहे. यानंतर उल्हासनगर पोलिसांनी कारवाई करत काही तरुणाची धरपकड सुरू केली आहे.

सहायक पोलिस आयुक्त डी. टी. टेळे यांनी आतांपर्यंत दोन जणांना अटक केली आहे तर बाकी लोकांचा शोध सुरु आहे. शहरात पोलीस कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून हाणामारी, चोरी, फसवणूक, चाकू हल्ला, महिलांची छेड आदी गुन्ह्यात वाढ झाल्याचे दिसत आहे. शहरात रात्रीच्या १० नंतर मुख्य रस्ते, चौक, गार्डन, मैदान, शासकीय कार्यालयाचें प्रांगण, नशेखोर, गर्दुल्ले, हुल्लडबाज तरुणांचा अड्डे बनले आहे. या ठिकाणी त्यांची दहशत असते. त्यामुळे शहरात सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.