रमजान साजरा करताय मग वाचा शासनाच्या ‘या’ मार्गदर्शक सूचना

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन :  राज्यात करोनाचा उद्रेक झाल्याने लॉकडाऊनचे संकट घोंगावत असतानाच राज्य सरकारने गुडीपाडव्याचा सणाच्या आदल्यादिवशी नियमावली जाहीर केली. राज्य सरकारकडून सण साजरे करण्यावरही बंधने घालण्यात येत असून रमजान सणासाठीही गाइडलाइन जारी करण्यात आल्या आहेत. गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षीही मुस्लिम बांधवांच्या रमजान महिन्यावर करोनामुळे करण्यात येणाऱ्या लॉकडाऊनचे सावट आहे. आज चंद्रदर्शन झाले तर उद्यापासून (१४ एप्रिल) एक महिन्याच्या उपवासांना सुरवात होणार आहे. इतर सण-उत्सवांप्रमाणेच रमजान महिन्यासाठीही राज्य सरकारने मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत.

धार्मिकस्थळी अगर रस्त्यावर गर्दी न करता घरातच सण साजरा करण्याच्या सूचना याद्वारे करण्यात आल्या आहेत. मुस्लिम धर्मात हा महिना पवित्र मानला जातो. यामध्ये महिनाभर उपवासासोबत विविध धार्मिक कार्यक्रमही असतात. मात्र, यावर्षीही ते गर्दी टाळून करण्याच्या सूचना सरकारतर्फे करण्यात आल्या आहेत. रमजान महिन्यात मुस्लिम समाजामध्ये मोठ्या संख्येने मशिदीमध्ये जाऊन सार्वजनिकरित्या नमाज अदा करण्याची प्रथा आहे.

या रमजानच्या कालावधीत मुस्लिम बांधव नमाज, तरावीह व इफ्तारसाठी एकत्र येतात. परिपत्रकानंतर व प्रत्यक्ष रमजान सण सुरू होण्याच्या व चालू असतानाच्या मधल्या कालावधीत आणखी काही सूचना प्रसिध्द झाल्यास त्यांचेदेखील पालन करावे.

‘या’ आहेत मार्गदर्शक सूचना

१) मुस्लीम बांधवांनी नियमित नमाज पठण, तरावीह तसेच इफ्तारसाठी मशिदीमध्ये अथवा सार्वजनिक ठिकाणी एकत्र न येता सर्व धार्मिक कार्यक्रम आपापल्या घरातच साजरे करावेत.

२) सार्वजनिक ठिकाणी एकावेळी पाचपेक्षा जास्त व्यक्तींनी एकत्र न येता नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी दुवा पठण (अलविदा जुम्मा) करण्याची प्रथा आहे. त्यासाठी मुस्लीम बांधव मोठया प्रमाणात मशिदीमध्ये येऊन दुवा पठण करतात. परंतू यावेळी कोणीही मशिदीमध्ये दुवा पठणाकरीता एकत्र जमू नये. आपापल्या घरातच दुवा पठण करावे.

३) शब-ए-कदर ही पवित्र रात्र रमजान महिन्याच्या २६ व्या दिवशी साजरी करण्याची प्रथा आहे. या निमित्ताने मुस्लीम बांधव तरावीह नमाज संपल्यानंतर आपल्या विभागातील मशिदीमध्ये रात्रभर कुराण पठण व नफील नमाज अदा करतात. परंतू यावर्षी सर्व मुस्लीम बांधवांनी सदर धार्मिक कार्यक्रम आपापल्या घरात राहूनच करावेत.

४) बाजारामध्ये खरेदीकरीता गर्दी करू नये किंवा एकत्र जमू नये.

५) धार्मिक स्थळे बंद असल्याने सर्व कार्यक्रमांचे आयोजन सरकारच्या नियमांचे पालन करुन बंद जागेत शक्यतो ऑनलाईन पध्दतीने आयोजित करण्यात यावेत.

६) रात्रीची संचारबंदी असल्यामुळे फेरीवाल्यांनी रस्त्यावर स्टॉल लावू नयेत तसेच नागरिकांनी विनाकारण रस्त्यावर फिरू नये.

७) कोणत्याही प्रकारे मिरवणुका, धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक अथवा राजकीय कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येऊ नये.

८) धार्मिक स्थळे बंद असल्याने मुस्लीम समाजातील धर्मगुरु, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेते आणि स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून रमजान महिना साधेपणाने साजरा करण्याच्या अनुषंगाने जनजागृती करण्यात यावी.

Leave a Comment