Friday, June 2, 2023

केंद्र सरकारकडून व्यावसायिकांना मोठा दिलासा, GST रिटर्न भरण्याची मुदत वाढवली

नवी दिल्ली । केंद्र सरकारने व्यापाऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. सरकारने मार्च 2021 मध्ये संपणाऱ्या 2020-21 या आर्थिक वर्षासाठी GST वार्षिक रिटर्न भरण्याची मुदत आणखी दोन महिन्यांनी वाढवली आहे. आता व्यापारी 28 फेब्रुवारी 2022 पर्यंत रिटर्न भरू शकतील. यापूर्वी ही अंतिम मुदत 31 डिसेंबर 2021 होती.

सेंट्रल बोर्ड ऑफ इनडायरेक्ट टॅक्सेज अँड कस्टम्स अर्थात CBIC ने बुधवारी रात्री उशिरा ट्विट करून ही माहिती दिली. CBIC ने म्हटले आहे की, फॉर्म GSTR-9 मध्ये वार्षिक रिटर्न भरण्याची आणि फॉर्म GSTR-9C मध्ये 2020-21 आर्थिक वर्षासाठी सेल्फ-सर्टिफाइड रिकांसिलेशन स्टेटमेंट सादर करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2021 ते 28 फेब्रुवारी 2022 पर्यंत वाढवण्यात आली आहे.

GSTR 9 म्हणजे काय ?
GSTR 9- GST अंतर्गत रजिस्टर्ड करदात्यांना वार्षिक रिटर्न भरावे लागतात. केंद्रीय GST 2017 च्या कलम 44(1) अंतर्गत GSTR-9 दाखल करायचा आहे. यामध्ये विविध टॅक्स हेड्स अंतर्गत आउटवर्ड आणि इनवर्ड पुरवठ्याची संपूर्ण माहिती असते.

1 जानेवारीपासून बदलणार GST चे नियम 
महत्त्वाचे म्हणजे 1 जानेवारी 2022 पासून GST सिस्टीममध्ये अनेक मोठे बदल होणार आहेत. यामध्ये ट्रांसपोर्ट आणि रेस्टॉरंट क्षेत्रात दिलेल्या सेवांवर ई-कॉमर्स सर्विस ऑपरेटरवरील कर दायित्वाचा समावेश आहे. या व्यतिरिक्त, फुटवेअर आणि टेक्सटाइल शुल्क संरचनेत बदल 1 जानेवारी 2022 पासून लागू होतील, ज्या अंतर्गत सर्व प्रकारच्या फुटवेअर्सवर 12% GST लागू होईल तर रेडिमेड कपड्यांसह सर्व टेक्सटाइल प्रोडक्ट्सवर (कापूस वगळता) 12% GST लागू होईल.

नवीन बदलानंतर, फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म Swiggy आणि Zomato सारख्या ई-कॉमर्स सर्विस प्रोव्हायडरची जबाबदारी असेल की त्यांनी दिलेल्या रेस्टॉरंट सेवांच्या बदल्यात GST गोळा करावे आणि ते सरकारकडे जमा करावे.