नागपूर ‘मध्य रेल्वे’ चा फुकट्यांना दणका ! दंड रूपात तब्बल ११ कोटींची केली वसुली

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नागपूर प्रतिनिधी । मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने गेल्या सहा महिन्यांमध्ये फुकट्या प्रवाशांकडून १० कोटी ९८ लाख रुपयांचा दंड वसूल केला. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांत विनातिकीट, अनियमित प्रवास, नोंदणी न करताच मालाची वाहतूक अशी अडीच लाख प्रकरणे पकडण्यात आली. डीआरएम सोमेशकुमार यांच्या मार्गदर्शनात व वरिष्ठ मंडळ वाणिज्य व्यवस्थापक कृष्णाथ पाटील यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली. एप्रिल ते सप्टेंबर २०१९ या काळात ही मोहीम राबविण्यात आली. मागील वर्षी याच कालावधीत फुकट्या प्रवाशांकडून ९ कोटी १७ लाख रुपये वसूल करण्यात आले होते. यंदा त्यात २ कोटींची भर पडली आहे.

एकट्या सप्टेंबर महिन्यात १ कोटी ४६ लाख रुपये वसूल करण्यात आले. मासिक पासधारकांनी आरक्षित डब्यातून प्रवास करू नये. त्यामुळे आरक्षित प्रवाशांची गैरसोय होते. त्याचप्रमाणे मासिक पासधारकांनी अनारक्षित कोचमधूनच प्रवास करावा, असे आवाहन मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने केले आहे. विनातिकीट प्रवास करणे कायद्याने गुन्हा आहे. असा प्रवास करणाऱ्यावर कायदेशीर कारवाई केली जाते.

त्यामुळे प्रवाशांनी तिकीट काढूनच प्रवास करण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे. दरम्यान आगामी दिवाळी उत्सवाच्या दरम्यान प्रवाश्यांची स्थानकांवर प्रचंड प्रमाणात गर्दी असते. ह्यामध्ये प्रशासनाकडून विशेष लक्ष देण्यात येणार आहे. तसेच सुरक्षेच्या दृष्टिकोनातून देखील उपाययोजना करण्यात येणार आहेत.

Leave a Comment