हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शेतकऱ्यांची कर्जमाफी, पिकाला हमीभाव यांसह विविध मागण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष माजी मंत्री बच्चू कडू यांनी अन्नत्याग आंदोलन पुकारलं आहे. आज या आंदोलनाचा सहावा दिवस आहे. राज्यभरातून बड्या नेत्यांनी बच्चू कडू यांच्या उपोषणस्थळी भेट देऊन त्यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. मात्र दुसरीकडे सरकारने अजूनही शेतकऱ्यांसाठी करण्यात आलेल्या मागण्या पूर्ण केलेल्या नाहीत. बच्चू कडू यांचा लढा अजूनही सुरूच आहे. याच दरम्यान, आता प्रहार संघटनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. शेतकऱ्यांच्या भल्यासाठी आम्ही ज्या मागण्या केल्या आहेत त्या सरकारने लवकरात लवकर पूर्ण कराव्या अन्यथा १५ जूनला संपूर्ण राज्यात चक्काजाम आंदोलन करण्यात येईल असा थेट इशारा सरकारला देण्यात आला आहे.
बच्चू कडू यांनी १६ मुद्दे मांडत शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी राज्य सरकारकडे केली आहे. मात्र सरकारने अजूनही या मागण्या पूर्ण करण्याबाबत हालचाल केलेली नाही. त्यामुळे प्रहार संघटना आक्रमक झाली आहे. शेतकऱ्यांसाठीच्या या लढ्याची धार आणखी बोथट करण्यासाठी येत्या १५ जूनला म्हणजेच रविवारी संपूर्ण महाराष्ट्रात चक्का जाम आंदोलन करण्याचा इशारा प्रहार संघटनेकडून देण्यात आला आहे.या चक्काजाम आंदोलनात कोणतीही गाडी रस्त्यावर फिरताना दिसणार नाही. महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांनी…. शेतकऱ्यांची काळजी असणाऱ्या विविध संघटनांनी आणि बच्चू कडू याना पाठिंबा देणाऱ्या पक्षांनी या आंदोलनात सहभागी व्हावं असं आवाहन प्रहार कडून करण्यात आलं आहे.
काल- परवा अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर प्रहारच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं होते. काही ठिकाणी रस्त्यावर जाळपोळ बघायला मिळाली. डवरगावात तर बच्चू कडू यांच्या कार्यकर्त्यांनी थेट टोकाचे पाऊल उचलत स्वतःला जमिनीत गाडून घेतलं. सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्यात, शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी, स्वामिनाथन आयोग लागू करावा अशा प्रकारच्या मागण्या करत प्रहारच्या कार्यकर्तांनी स्वतःलाच जमिनीत गाडून घेत टोकाचं पाऊल उचललं. एकूणच काय तर बच्चू कडू यांचं अन्नत्याग आंदोलन हळू हळू उग्र रूप घेताना दिसतंय. अशावेळी सरकारला आता तरी जाग येईल का? मंत्र्यांचे डोळे आता तरी उघडतील का? हा प्रश्न आहे.
दरम्यान, बच्चू कडू यांच्या अन्नत्याग उपोषणाला देशभरातून मोठा पाठिंबा मिळत आहे. शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी यापूर्वीच मोझरी येथील उपोषणस्थळी भेट देऊन बच्चू कडू याना जाहीर पाठिंबा दिला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही बच्चू कडू यांच्या फोनवरून संवाद साधला. राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर आणि मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनीही बच्चू कडू यांची भेट घेतली. राजू शेट्टी यांनीही बच्चू कडू याना साथ देत सरकारला इशारा दिला. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी सुद्धा बच्चू कडू याना पाठिंबा दिला. शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार स्वतः मोझरीला जाऊन बच्चू कडू याना पाठिंबा देऊन आले. याशिवाय, खासदार निलेश लंके, रविकांत तुपकर यांनी बच्चू कडू यांच्या आंदोलनला भेट दिली होती.