सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
खासदार उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त उदयनराजे भोसले मित्र समूहच्या वतीने उद्या बुधवार दि. 23 रोजी सातारा जिल्हा परिषदेच्या मैदानावर “चला हवा येऊ द्या” हा संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेला हास्यविनोद यांनी भरलेला कार्यक्रम सादर केला जाणार आहे. या कार्यक्रमाकरिता उभारण्यात येणारे व्यासपीठ व इतर सुविधा उपलब्ध करून देण्याच्या कामाचा शुभारंभ झाला.
या कार्यक्रमासाठी 80 बाय 60 चे भव्य व्यासपीठ उभारण्यात आले आहे. आधुनिक पद्धतीचे स्टेज बॅकग्राऊंड सर्वोत्तम ध्वनीयंत्रणा व लेझर लाईट सिस्टीम अशा अद्ययावत तंत्रज्ञानाणे हा कार्यक्रम समृद्ध आहे. कलाकारांसाठी एकूण 20 मेकअप रूम आणि आपत्कालीन कारणासाठी टॉयलेट व्यवस्था जिल्हा परिषदेच्या मैदानावर केली आहे. याशिवाय मैदानावर ठिकाणी एलईडी स्क्रीन उभारण्यात येणार असून कार्यक्रमाच्या थेट प्रक्षेपणासाठी पाच व्हॅनिटी व्हॅन उपलब्ध असणार आहेत. सदरचा कार्यक्रम संपूर्ण सातारकर रसिकांसाठी विनामूल्य असून याकरिता कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. नागरिकांना हा कार्यक्रम मोफत असावा अशा स्पष्ट सूचना खासदार उदयनराजे भोसले यांनी केले आहेत.
या कार्यक्रमाच्या व्यवस्थापनासाठी सातारा जिल्हा पोलिस दलाचे सहकार्य लाभले आहे. या कार्यक्रमात अजय-अतुल संगीत दिग्दर्शित आणि नागराज मंजुळे यांनी दिग्दर्शन केलेल्या झुंड या हिंदी चित्रपटातील कलाकार यावेळी उपस्थित राहणार आहेत. या स्टेजच्या उभारणीच्या प्रसंगी माजी शिक्षण सभापती सुनील काटकर, काका धुमाळ, माजी उपनगराध्यक्ष किशोर शिंदे, बाळासाहेब गोसावी, माजी जिल्हा परिषद सदस्य समृद्धी जाधव, राहुल पाटोळे, शेतकरी संघटनेचे राजू पाटील, सुनील बर्गे, प्रशांत निंबाळकर, संदीप शिंदे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.