चाळीसगाव : हॅलो महाराष्ट्र – चाळीसगाव येथील स्वामी विवेकानंद माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक व महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या चाळीसगाव शाखेचे कार्याध्यक्ष विजय पाटील यांचे शुक्रवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. दोन आठवड्यांअगोदर त्यांच्या सासऱ्यांचे देखील निधन झाले होते. सासऱ्याच्या मागोमाग जावयाचासुद्धा मृत्यू झाल्याने सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे.
काय घडले नेमकं
मुख्याध्यापक विजय पाटील यांचे सासरे निवृत्त शिक्षक भीमराव पाटील यांचे दोन आठवड्यांपूर्वी पाचोरा या ठिकाणी निधन झाले होते. त्यांचे जावई विजय पाटील हे त्यांच्या अंत्यविधीसाठी गेले असता त्यांची प्रकृती बिघडली. यामुळे त्यांना चाळीसगावमधील डॉ. मंगेश वाडेकर यांच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांच्या प्रकृतीत बऱ्यापैकी सुधारणा झाली होती. मात्र अचानक शुक्रवारी त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि उपचारादरम्यानच त्यांचा मृत्यू झाला.
विजय पाटील हे हाडाचा शिक्षक, कुशल संघटक, दिलदार मित्र, आदर्श व्यक्तिमत्त्वाचे धनी अशा अनेक उपाधी लाभलेले मुख्याध्यापक होते. त्यांच्या अचानक जाण्याने सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे. विजय पाटील यांनी शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माध्यमातून त्यांनी आपल्या कार्याचा वेगळा ठसा निर्माण केला होता. विजय पाटील यांच्या माघारी आई, पत्नी, मुलगा, दोन भाऊ असा परिवार आहे.