हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या दोन दिवसांपूर्वीच ठाकरे गटाच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्या विरोधात कोविड घोटाळा प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे याचा चांगलाच धक्का उद्धव ठाकरेंना बसला आहे. आता उद्धव ठाकरे यांना धक्का देणारी आणखीन एक बातमी समोर आली आहे. सांगलीच्या मिरजेचे ठाकरे गटातील शहर प्रमुख चंद्रकांत मैंगुरे यांना पुन्हा ईडीकडून नोटीस पाठविण्यात आली आहे. पुढील चौकशीसाठी कार्यालयात हजर राहण्याबाबत ईडीकडून चंद्रकांत मैंगुरे यांना सांगण्यात आले आहे.
गेल्या दोन महिन्यांपूर्वीच व्यापारी पारेख बंधुंच्या घरावर ईडीने छापेमारी केली होती. याप्रकरणी चंद्रकांत यांना ईडी कडून नोटीस पाठवण्यात आली होती. तसेच त्यांची गेल्या सहा जुलै रोजी चौकशी देखील झाली होती. आता पुन्हा एकदा 1 सप्टेंबरपर्यंत पुढील चौकशीसाठी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश ईडीकडून चंद्रकांत यांना देण्यात आले आहेत. ईडी कार्यालयातून चंद्रकांत यांना फोन आला असून त्यांनी पुढील चौकशीसाठी यावे असे सांगण्यात आले आहे. या चौकशीत जर चंद्रकांत यांच्या विरोधात काही पुरावे सापडले तर त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, गेल्या दोन महिन्यांपूर्वी एका चोरीच्या प्रकरणात चंद्रकांत मैंगुरे यांना अटक करण्यात आली होती. चंद्रकांत यांच्यावर 20 लाख रुपयांचा चेक चोरून बँकेतून पैसे काढण्याचा आरोप याप्रकरणी लावण्यात आला होता. मधूकुमार यांच्याकडून चंद्रकांत यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता पुन्हा एकदा चंद्रकांत मैंगुरे दुसऱ्या एका प्रकरणासाठी अडचणीत सापडले आहेत. त्यांची पारेख बंधुंच्या घरावर छापेमारी केल्यानंतर ईडी कडून चौकशी करण्यात आली आहे.