सांगली | ‘राजकारणात आपल्याला कोण धक्का देणार नाही, असे सांगलीतल्या एका मोठ्या नेत्याला वाटत होते, पण भाजपने त्यांना यापूर्वी धक्के दिले आहेत. आता येणाऱ्या निवडणुकांमध्ये त्यांना शॉक देणाऱ्या भाजपच्या स्थानिक नेत्याला मी सोन्याचा मुकुट देणार आहे,’ अशी घोषणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दसऱ्याच्या मुहूर्तावर केली.
शुक्रवारी दुपारी सांगलीत ते भाजपच्या कार्यकर्त्यांसमोर बोलत होते. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी यापूर्वीच सांगली महापालिका आणि इस्लामपूर नगरपरिषदेत सत्तांतर घडवून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना राजकीय धक्के दिले आहेत. आता पुन्हा एकदा जयंत पाटील यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरू आहे. शुक्रवारी दुपारी भाजपच्या कार्यकर्त्यांसमोर बोलताना प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘सांगलीतल्या एका मोठ्या नेत्याला असे वाटत होते की, राजकारणात आपल्याला कोण धक्का देणार नाही, पण यापूर्वीच भाजपने त्यांना धक्के दिले आहेत. आता आगामी निवडणुकांमध्ये त्यांना शॉक देणाऱ्या भाजपच्या स्थानिक नेत्याला मी सोन्याचा मुकुट देणार आहे. हा मुकुट कोण मिळवणार ते पाहूया. राज्यात शरद पवार हे भाजपसाठी आव्हान नाहीत. 56 च्यावर त्यांचे कधीही आमदार निवडून आले नाहीत. त्यामुळे राष्ट्रवादी भाजपसाठी आव्हान ठरू शकत नाही, असेही विधान प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले.
‘देशात नरेंद्र मोदी सत्तेत आल्यापासून सामान्य माणूस राजकारणाच्या केंद्रबिंदूवर आला आहे. सामान्य माणसांकडे पैसा नसला तरी कर्तृत्व आहे.’ ‘या कर्तृत्वाला संधी मिळावी, यासाठीच विरोधी पक्षांच्या स्थानिक नेत्यांना शॉक देण्याची गरज आहे. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच केंद्रात २७ ओबीसी मंत्री आहेत. इंदिरा गांधींनाही ते शक्य झाले नव्हते’, असे प्रदेशाध्यक्ष पाटील म्हणाले. यावेळी सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांच्यासह भाजपचे स्थानिक कार्यकर्ते उपस्थित होते.