धुळे प्रतिनिधी । तीन वर्षांपूर्वी सर्जिकल स्ट्राईक मोहीमवेळी पाकिस्तानची सीमारेषा ओलांडलेल्या आणि पुन्हा सुखरूप माघारी आलेल्या चंदू चव्हाणची नवीन शोकांतिका आज समाजमाध्यमांवर आली आहे. सेवेत पुन्हा रुजू झाल्यापासून मला योग्य पद्धतीने वागणूक दिली जात नसल्याचा खळबळजनक आरोप चंदू चव्हाण याने केला आहे. सुभाष भामरे आणि सुषमा स्वराज यांच्या प्रयत्नातून चंदूची सुटका करणं भारतीय लष्कराला शक्य झालं होतं. सेवा बजावत असताना आपल्याला अधिकारी दुय्यम वागणूक देतात, आपल्याला हव्या त्या गोष्टी देताना अन्याय करतात. मागील अनेक दिवसांपासून त्यांचं वर्तन मुकाट्याने सहन केलं असून आता आपण आंदोलनाच्या भूमिकेतून कायदेशीर लढाई लढणार असल्याचं चंदूने सांगितलं आहे. माझ्या या कृत्यामुळे संभाव्य परिणाम काय होऊ शकतात याचा मी विचार केला असून प्रामाणिक सेवा बजावल्यानंतरही त्रासच मिळणार असेल तर या ठिकाणी थांबण्याची आपली इच्छा नसल्याचं चंदूने सांगितलं आहे. दरम्यान भारतीय लष्कर या प्रश्नावर काय भूमिका घेतं हे पाहणं रंजक ठरणार आहे.