कराड प्रतिनिधी सकलेन मुलाणी
पुणे- बंगळूर महामार्गावर कराड व मलकापूर शहराच्या हद्दीत नव्याने होणाऱ्या सहापदरी उड्डाणपूल होणार असल्याने आता पुन्हा एकदा वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. कोल्हापूर नाका येथील उड्डाणपूल पाडण्याचे काम गेल्या 20 ते 25 दिवसापासून सुरू आहे. आता मलकापूर फाट्यावरील उड्डाणपूल पाडण्याचे काम सुरू करण्यात येणार असल्याने जिल्हा पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी वाहतुकीतील बदलाची अधिसूचना जारी केली आहे.
कराड शहरात आत व बाहेर करण्यासाठी वाहनांना आहे तोच मार्ग राहणार आहे. केवळ ढेबेवाडी फाट्यावर जात, भादी हार्डवेअर (पादचारी उड्डाणपूल) पासून यु- टर्न घ्यावा लागेल. परंतु कोल्हापूर, सांगली व कर्नाटकाकडे तसेच मुंबई- पुण्याला जाणाऱ्या वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. त्यामुळे आता वाहतूकीची कोंडी होणार आहे. यामध्ये प्रामुख्याने मलकापूर फाटा येथे वाहतूकीची समस्या मोठी जटील बनू शकते. परंतु पोलिस यंत्रणा सतर्क असल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच 25 मार्चपर्यंत मलकापूर फाट्यावरील उड्डाणपूल जमीनदोस्त करण्यात येणार आहे.
असा असणार आता वाहतुकीत बदल
1)मलकापूर फाट्यावरील उड्डाणपूल पाडण्याचे काम सुरू होणार असल्याने आता सेवा रस्त्यावरूनच वाहतुक सुरू राहील.
2)कोल्हापूर, सांगली व बेळगाव येथून येणारी वाहने कोयना आैद्योगिक वसाहत (डी- मार्ट) येथील सेवा रस्त्यावरून अमित हाॅटेलपर्यंत सेवा रस्त्यावरून प्रवास करतील. तेथून पुढे कोयना पुलावरून मार्गस्थ होतील.
3)कृष्णा हाॅस्पीटल समोरील तसेच ढेबेवाडी फाटा येथील भुयारी मार्ग खुला राहील.
4)साताऱ्याला जाण्यासाठी कराड शहरातून बाहेर येवून पादचारी उड्डाण पूलाखालून यु- टर्न घ्यावा लागणार आहे.
5)कोल्हापूरला जाणारी वाहने ही कोल्हापूर नाका- अक्षता मंगल कार्यालय पुढे गंधर्व हाॅटेल मार्गे हायवेला जातील व पुढे नेहमीप्रमाणे मार्गस्थ होतील.