हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| नुकतीच केंद्र सरकारने (Central Government) खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना मोठी भेट दिली आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) कर्मचारी ठेवीशी संलग्न विमा (EDLI) योजनेत तीन महत्त्वाचे बदल केले आहेत. ज्याचा थेट फायदा लाखो कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना होणार आहे. हे बदल विमा लाभ, सेवा कालावधी आणि मृत्यू लाभांच्या नियमांशी संबंधित आहेत.
1 वर्षाच्या आत मृत्यू झाल्यासही विमा लाभ मिळणार
यापूर्वी जर एखाद्या कर्मचारीने एका वर्षापेक्षा कमी सेवा दिली असताना त्याचा मृत्यू झाला, तर त्याच्या कुटुंबाला EDLI योजनेअंतर्गत कोणताही लाभ मिळत नव्हता. मात्र, नव्या नियमानुसार, आता अशा परिस्थितीतही कुटुंबाला किमान 50,000 चा विमा लाभ मिळेल. यामुळे दरवर्षी सुमारे 5,000 कुटुंबांना थेट आधार मिळणार आहे.
मृत्यू लाभासाठी नवीन नियम लागू
पूर्वी, जर एखाद्या कर्मचाऱ्याने काही काळ पीएफमध्ये योगदान दिले नसेल आणि त्याचा मृत्यू झाला, तर त्याच्या कुटुंबाला EDLI चा लाभ मिळत नव्हता. मात्र, आता हा नियम बदलण्यात आला आहे. जर कर्मचाऱ्याचा मृत्यू शेवटच्या योगदानाच्या सहा महिन्यांच्या आत झाला आणि तो अद्याप कंपनीच्या नोंदीत असेल, तर त्याच्या कुटुंबाला EDLI योजनेचा लाभ मिळेल. या बदलामुळे दरवर्षी सुमारे 14,000 कुटुंबांना दिलासा मिळणार आहे.
नोकरी बदलल्यासही सेवा कालावधी खंडित होणार नाही
पूर्वी जर एखाद्या कर्मचाऱ्याने नोकरी बदलताना काही दिवसांचा ब्रेक घेतला, तर तो सेवा खंडित मानला जात असे, आणि याचा परिणाम विमा लाभावर होत असे. मात्र, नव्या नियमानुसार, दोन नोकऱ्यांमधील अंतर दोन महिन्यांपर्यंत असेल, तर तो कालावधी सततची सेवा म्हणून ग्राह्य धरला जाईल. यामुळे कुटुंबाला EDLI चा विमा लाभ मिळण्यास अडथळा येणार नाही. या निर्णयामुळे दरवर्षी सुमारे 1,000 कुटुंबांना फायदा होईल.
दरम्यान, EDLI योजना 1976 पासून लागू असणार आहे. ती EPF सदस्यांना जीवन विमा संरक्षण प्रदान करते. जर एखादा कर्मचारी सेवेत असताना मृत्यू झाला, तर त्याच्या कुटुंबाला 7 लाखांपर्यंतचा विमा लाभ मिळू शकतो. ही योजना कुटुंबांसाठी मोठा आधार बनली आहे. आता EPFO च्या या महत्त्वपूर्ण सुधारणांमुळे लाखो कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना आर्थिक सुरक्षेचा आधार मिळणार आहे.