सिटीस्कॅनसाठी जास्त दर आकारल्यास कारवाई होणार

मनपाने रुग्णालयांना ठरवून दिले चाचण्यांचे दर

औरंगाबाद : खासगी रुग्णालयांत मागील काही दिवसांपासून गरज नसतानाही कोरोना रुग्णांची सिटीस्कॅन चाचणी केली जात आहे.  यासाठी मनमानी शुल्कही आकारले जात असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे महापालिकेने शासन निर्देशांनुसार खासगी रुग्णालये किंवा सिटीस्कॅन तपासणी केंद्रांना सिटीस्कॅन चाचणीचे दर निश्चित करून दिले आहे. यापेक्षा जास्त दराने आकारणी केल्यास संबंधित खासगी रुग्णालयासह सिटीस्कॅन तपासणी केंद्रावर थेट कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही दिला आहे.

पालिका प्रशासक तथा आयुक्‍त आस्तिककुमार पांडेय यांनी यासंबंधीचे आदेश जारी केले आहे. शहरात कोरोना संसर्गाचा उद्रेक वाढला असून दररोज आठशे ते हजार रुग्ण आढळून येत आहेत. यातील बहुतांश रुग्ण हे 50 वर्षापेक्षा जास्त वयाचे आहे. त्यामुळे उपचार घेतांना खासगी रुग्णालयाकडून सिटीस्कॅन करण्याची सक्ती केली जात आहे. सिटीस्कॅनद्वारे रुग्णांचा एचआरसीटी स्कोर तपासून त्यांच्यावर उपचार केले जात आहे. वास्तविक एचआरसीटी करण्याची आवश्यकता नसल्याचे केंद्रीय पथकाने नुकतेच पाहणीत स्पष्ट केले आहे.

मात्र खासगी रुग्णालये किंवा सिटीस्कॅन तपासणी केंद्रांमधून रुग्णांची एचआरसीटीसाठी रुग्णांची लुट केली जात असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. या तक्रारीची दखल घेऊन महापालिकेने केंद्रीय पथकाच्या सूचनेनुसार खासगी सिटीस्कॅन केंद्रांसाठी एचआरसीटीचे दर निश्चित करून दिले आहे. निश्चित दरापेक्षा जास्त आकारणी केल्यास संबंधितांवर साथरोग कायदा 1897, आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005, मेस्मा अ‍ॅक्ट 2011,  द मुंबई नर्सिंग होम अ‍ॅक्ट 2006,  अ बॉम्बे पब्लीक ट्रस्ट अ‍ॅक्ट 1950 नुसार कायद्यातील तरतूदीनुसार कारवाई केली जाईल,  असा इशारा दिला आहे.

एचआरसीटी तपासणीचे निश्‍चित दर :  सर्वात कमी क्षमतेच्या मशीनसाठी : 2 हजार रुपये,  16 ते 64 स्लाईस क्षमतेच्या मशीनसाठी 2500 रूपये,  64 पेक्षा अधिक स्लाईस क्षमतेच्या मशीनसाठी 3 हजार रूपये असे राहणार आहे.

संपूर्ण तपासणी अहवाल बंधनकारक : नोदणीकृत डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय ही तपासणी करू नये, एचआरसीटी-चेस्ट तपासणी करणार्‍या रेडिओलॉजिस्टने संपूर्ण तपासणी अहवाल देणे आवश्यक आहे. विमा योजना किंवा रुग्णालयाने किंवा कॉर्पोरेट खासगी आस्थापनाने जर एचआरसीटी चेस्ट तपासणी केंद्राशी सामंजस्य करार केलेला असेल तर त्यासाठी हे दर लागू राहणार नाही. तपासणीसाठी निश्चित केलेले दर खासगी रुग्णालये किंवा सिटीस्कॅन तपासणी केंद्रांच्या दर्शनी भागात लावावे. हे दर साथरोग कायदयाची अंमलबजावणी असेपर्यंत राहील. तपासणी केलेल्या संशयित किंवा पॉझिटिव्ह रुग्णांचा दररोज अहवाल पालिकेला पाठवणे बंधनकारक आहे.

You might also like