सोलापुर : विजापूर नाका पोलिस स्टेशनच्या हद्दीत शनिवारी रात्री पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करुन इनोव्हा गाडीतून तब्बल 1 कोटी 24 लाख किमतीचा गांजा जप्त केला आहे. या कारवाईत पोलिसांना 623 किलो गांजा सापडला आहे. पोलिसांच्या या धाडसी कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.
हाती आलेल्या माहितीनुसार, विजापूर नाका पोलिस स्टेशनचे पीएसआय विजय मुलाणी तसेच काॅन्स्टेबल अमृत सुरवसे व काॅन्स्टेबल प्रकास राठोड हे शनिवारी रात्री पेट्रोलिंग करत होते. यावेळी एक इनोव्हा गाडी त्यांना भरधाव वेगाने क्रोस झाली. वेगाने जाणार्या इनोव्हा गाडीची हालचाल त्यांना संशयास्पद जाणवल्याने मुलाणी यांनी सदर गाडीचा पाठलाग केला.
मध्यरात्री सिनेस्टाईल पाठलाग करुन पोलिसांनी गाडी अडवली. यावेळी गाडीत काही पोती सापडली. यामध्ये तब्बल 623 किलो गांजा असल्याचं तपासात निष्पन्न झाले. या गांजाची किंमत 1 कोटी 24 लाख रुपये असल्याची माहिती डॉ. वैशाली कडूकर, पोलीस उपायुक्त, सोलापूर यांनी दिली आहे.
दरम्यान, गाडीचा पाठलाग करत असताना तीन आरोपीपैकी दोन आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत. तर एका आरोपीला विजापूर नाका पोलिसांनी अटक केली आहे.
सोलापूर पोलिसांनी बजावलेल्या या जबरदस्त कामगिरीबद्दल सोलापुरातून पोलिसांच कौतुक होत आहे. याबाबत डॉ. वैशाली कडूकर, पोलीस उपायुक्त, सोलापूर यांनी माहिती दिली आहे. या कारवाईत सहा. पोलिस आयुक्त प्रिती टिपरे, पी.एस.आय. मुलाणी, काॅन्स्टेबल अमृत सुरवसे व काॅन्स्टेबल प्रकास राठोड यांचा सहभाग होता.




