खटाव | दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला पुसेगाव पोलिसांनी राजापूर फाटा (ता. खटाव) येथे अटक करून त्यांचेकडून चोरीच्या 5 मोटारसायकली, नऊ मोबाईल, दोन तलवारी, व दरोडा टाकण्याचे साहित्य असे मिळून 2 लाख 25 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. मागील काही दिवसापासून वाढत्या मोटारसायकली चोरी, घरफोड्या सत्राचे प्रमाण वाढले होते.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 6/2/2022 रात्री दहा वाजण्याच्या सुमारास पुसेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सपोनि. संदीप शितोळे, सुनील अबदागिरे , वैभव वसव, पुष्कर जाधव, उमेश देशमुख, व आशोक सरक हे पेट्रोलिंग करत असताना, बुध (ता. खटाव) हद्दीत राजापूर फाट्यावर संशयित इसम दिसून आले. त्यांना विचारपूस केली असता, ते उडवाउडवीची उत्तरे देत शेतीकडे पळून जाऊ लागले. त्यांच्यावरील संशय बळावल्याने त्यांचा पाठलाग करून त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता, दरोडा टाकण्याच्या उद्देशाने आलो असल्याचे सांगितले. संशयिताजवळ त्यांचे ताब्यातील 2 पल्सर मोटरसायकल, 2 तलवारी, 5 मोबाइल, स्क्रू ड्रायव्हर, पक्कड, गजविल पाना असे दरोडा टाकण्याचे साहित्य मिळून आले. त्यांना पोलीस स्टेशनमध्ये आणून विश्वासात घेऊन विचारपूस केली असता फलटण, पुणे, बारामती, पाटस, भिगवण चोऱ्या केले बाबत सांगितले.
यामध्ये सापडलेले आरोपी, विक्रम तुकाराम आगवणे (वय- 28 रा. निंभोरे ता. फलटण), रवींद्र भरत शिरतोडे (वय- 20 सध्या रा. बोरखळ, मुळगाव निंबोरे ता. जि. सातारा), दीपक शंकर मदने (वय- 19, रा. गुरसाळे, ता. माळशिरस, जि. सोलापूर), आदित्य लाला जाधव (वय- 20 रा. ठाकुरकी, ता. फलटण), राजेश बापूराव पाटोळे (वय- 19 रा. धर्मपुरी ता. माळशिरस, सोलापूर) यांचेवर पुसेगाव पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल केला असून,अधिक तपास केला असता, चोरीच्या पाच मोटारसायकली 9 मोबाईल व मुद्देमाल जप्त करण्यात पुसेगाव पोलिसांना यश आले, त्यांना अटक करून पोलिस कस्टडी घेण्यात आलेले आहे. अधिक तपास सपोनि संदीप शितोळे व सहकारी करीत आहेत.