कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर
लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना “भारतरत्न” पुरस्कार देऊन सन्मानित करण्यासाठी केंद्र सरकारकडे शिफारस करण्यात यावी या मागणीचे निवेदन प्रा.एन.डी.पाटील, आमदार चंद्रकांत जाधव व आमदार ऋतुराज पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली. यावेळी जलसंपदा मंत्री जयंत पाटील सुद्धा उपस्थित होते.
या निवेदनात राजर्षी शाहू महाराज हे लोककल्याणकारी कार्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिली. बहुजनांना शिक्षण, जातीभेद निर्मूलन, नोकऱ्यांमध्ये आरक्षण आणि स्त्रीमुक्तीसाठी कायदे करणारे सुधारणावादी समाजसुधारक होते. आरक्षणाचे जनक, समतावादी लोकराजे राजर्षी शाहू महाराज हे २० वर्षाचे असताना कोल्हापूर संस्थानचे राजे झाले. महात्मा ज्योतिबा फुलेंच्या मानवतावादी कार्याचा त्यांच्यावर फार मोठा प्रभाव होता. त्यामुळे कोल्हापूर संस्थानची गादी हाती आल्यानंतर त्यांनी सामाजिक सुधारणांचे कार्य केले.
शिक्षणावरील उच्चवर्णीय मक्तेदारीस विरोध करून बहुजन समाजातील लोकांना शिक्षण घेता यावे यासाठी राजर्षी शाहू महाराज यांनी केलेल्या ऐतिहासिक कार्याचा गौरव म्हणून त्यांना “भारतरत्न” किताब देण्यासाठी दोन्ही सभागृहाकडे ठराव करून केंद्र सरकारकडे शिफारस करावी, अशी मागणी आमदार चंद्रकांत जाधव यांनी केली.
दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.