महामंडळातून बिनव्याजी कर्जाचे अमिषाने साडेतीन लाखाची महिलेची फसवणूक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा | जिल्हा उद्योग केंद्र व अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ येथून एकूण 15 लाख रुपयांचे बिनव्याजी कर्जाचे अमिष दाखवून 3 लाख 43 हजार रुपयांची फसवणूक झाली आहे. याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी महिलेने शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. चंद्रकांत बापू कोळपे (वय- 29, रा. संगममाहुली), अमोल बबन साळुंखे (वय- 42, रा. चोरे धावरवाडी ता. कराड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी सौ. वनिता नितीन साळुंखे (वय- 47, रा. कामथी पो. वेळे ता. सातारा) यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, फिर्यादी वनिता साळुंखे यांनी म्हटले आहे, की जुलै 2021 पासून संशयित वेळोवेळी कर्ज देतो, असे सांगून फसवणूक केली. संशयितांनी जिल्हा उद्योग केंद्रातून 5 लाख रुपयांचे बिनव्याजी कर्ज देतो, असे सांगून तक्रारदार महिलेसह काही जणांना सांगितले. तसेच 10 लाख रुपयांचे कर्ज अण्णाभाऊ साठे महामंडळातून सबसिडीसह देतो असेही सांगितले.

त्याबदल्यात संशयितांनी वेळोवेळी तक्रारदार महिलेसह इतरांकडून 3 लाख  43 हजार रुपये घेतले. पैसे दिल्यानंतर कर्ज मिळेल या आशेवर असताना संशयितांकडून नंतर प्रतिसाद मिळेना. संशयितांकडून टाळाटाळ होवू लागल्याने अखेर तक्रारदार एकत्र आले व त्यांनी शहर पोलिस ठाण्यात जावून घडलेल्या घटनेची माहिती दिली. त्यावरुन पोलिसांनी दोघांविरुध्द गुन्हा दाखल केला.